पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक २०१६ (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी जाहीर करण्यात आला. मोठ्या कष्टाने परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. एमपीएससीतर्फे ७५० उमेदवारांची शिफारस पीएसआय पदासाठी करण्यात आली आहे.समांतर आरक्षणाच्या वादात अनेक पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळे पीएसआय पदाची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे वय वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. त्यामुळे वयोमर्यादा उलटून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करीत यश मिळविले.पीएसआयच्या मुख्य परीक्षेपर्यंत जाऊ शकलेल्या १ हजार ६९३ विद्यार्थ्यांचा निकाल एमपीएससीतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. मात्र, त्यातील केवळ ७५० उमेदवारांची शिफारस एमपीएससीकडून करण्यात आली आहे. त्यात खुल्या संवर्गातील २१४ मुलांचा व १७० मुलींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओबीसी संवर्गातील ६२ आणि एससी संवर्गातील ७१ व एसटी संवर्गातील ३४ उमेदवारांची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.>एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालानुसार :१) प्रथम : सोमनाथ दौड२) द्वितीय : उदय पाटील३) तृतीय : किशोर मोटिंगे
पीएसआय परीक्षेचा निकाल २ वर्षांनी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:54 AM