पुणे : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी उत्सुक अशा परदेशातील विद्यार्थ्यांला पं. भीमसेन जोशी पाठ्यवृत्तीची लवकर घोषणा केली जाणार आहे. १८ लाख रुपयांची ही पाठ्यवृत्ती असून, विद्यार्थ्याला १२ लाख रुपये आणि गुरूंना ६ लाख रुपये, असे त्याचे विभाजन करण्यात आले आहे. या पाठ्यवृत्तीसाठी विविध देशांतून ४० अर्ज आले असून, संगीत नाटक अकादमीतील तज्ज्ञांची समिती पाठ्यवृत्तीधारकाचे नाव निश्चित करेल, अशी माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
पहिली पाठ्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम येत्या दोन महिन्यांमध्ये पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय कोरोनामुळे वर्षभरापासून काहीच उत्पन्न नसलेल्या भटक्या विमुक्त जमाती आणि उपेक्षित समाजातील कलाकारांनी घरात बसून आपले कार्यक्रम करावी, अशा उद्देशातून ‘कलाविश्व’ योजना राबविण्यात येत आहे. या कलाविष्कारासाठी त्यांना सुमारे १५ हजार रुपये मानधन दिले जात आहे. त्यासाठी दरमहा ५० हजार रुपयांची तरतूद असून, त्यातून तीन कार्यक्रम सादर केले जातात. परदेशातील विद्यार्थ्यांना हे कार्यक्रम समजावेत या उद्देशातून या कार्यक्रमाचे इंग्रजीतून समालोचन असते. अशा स्वरूपाचे आतापर्यंत देशभरात २८ कार्यक्रम झाले आहेत, असेही ते म्हणाले.
-----------------------------------