पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाजवादक पं. गोविंद भिलारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मृदंगाचार्य शंकर वसंत फाऊंडेशन व शिष्य मंडळीच्या वतीने सांगीतिक आदरांजली वाहण्यासाठी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पं. गोविंद भिलारे यांचे शिष्य आकाश तुपे, ज्ञानेश कोकाटे, सिद्धेश उंडाळकर, ज्ञानेश्वर दुधाणे, मनीष तांबोसकर, गणेश चौधरी, स्वप्नील सूर्यवंशी, ज्ञानेश्वर हिरगुडे, भूषण भागवत यांनी पखवाजवादन केले. त्यामध्ये पं. वसंतराव घोरपडकर यांच्या रचना सादर करण्यात आल्या.
युवा गायक नागेश आडगावकरने ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म’ आणि ‘धीरे धीरे रे मना’ हे अभंग सादर केले. पं. सुनील अवचट यांचे बासरीवादन झाले. पं. समीर दुबळे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व कलाकारांना किशोर कोरडे, देवेंद्र देशपांडे, सिद्धेश उंडाळकर, चारुदत्त फडके, देवेंद्र देशपांडे यांनी समर्पक साथ केली. गणेश भगत यांनी सूत्रसंचालन केले. आकाश तुपे यांनी आभार मानले. या वेळी गोविंद भिलारे यांचे भाऊ नारायण भिलारे, भगवान भिलारे, पत्नी मनीषा भिलारे, श्रेया भिलारे, शिवतेज भिलारे उपस्थित होते.