पुणे : वीक एंडला पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये चालू असणाऱ्या धिंगाण्याची पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री शहरातील पंचतारांकित हॉटेलमधील पबवर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापे घातले. त्यात पब, पंचतारांकित हॉटेल, हुक्का पार्लर यांचा समावेश असून तेथे आढळलेल्या बेकायदेशीर बाबींवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी मध्यरात्री 1 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हे छापा सत्र सुरू होते.
कोरेगाव पार्क परिसरातील मॅकलारेन्स पब, डेली ऑल डे, बार स्टाल्क एकसचेंज, तसेच मुंढवा परिसरातील येकी, नाईट नायडर, नाईट स्काय, वेस्टींन, पेंटहाऊस, हार्ड रॉक, ओकवूड, ब्ल्यु शार्क तसेच मयामी, जे डब्ल्यु मेरियट अशा पबवर पोलिसांनी छापे घातले. याठिकाणी जवळपास 6 हजार ते 7 हजार तरुण-तरुणी होत्या. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, भागूप्रताप बर्गे तसेच 6 पोलीस निरीक्षक, 6 सहायक पोलीस निरीक्षक, 40 पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी पुण्यात जाणवणाऱ्या समस्यांविषयी पत्रकारांकडून माहिती घेतली होती. त्यावर पुण्यातील बदललेल्या नाईट लाईफ व मध्यरात्री होणाऱ्या गोंधळाविषयी त्यांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.