पिंपरी : थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये मिळकतधारकांना सवलत देण्यात येणार आहे. अभय योजनेंतर्गत १ ते २९ फेब्रुवारी २०१६ अखेर मालमत्ता कर भरल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये ७५ टक्के, तर १ ते ३१ मार्चअखेर मालमत्ता कर भरल्यास ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. कर भरण्यासाठी शहरात महापालिकेची १५ करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मिळकतधारकांना कराच्या रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के दराने दंड आकारण्याची तरतूद आहे. सन २०१०-११ पासून या तरतुदीनुसार शास्ती कर लागू करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या व दुसऱ्या सहामाहीची रक्कम न भरणाऱ्या मिळकतधारकांना अनुक्रमे १ आॅक्टोबर व १ जानेवारीपासून प्रतिमहिना दोन टक्के दराने दंड लागू करण्यात आला आहे. मिळकत बंद असणे, मालक व भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रुंदीकरणामुळे पूर्णत: किंवा अंशत: पाडलेल्या मिळकती, तसेच आर्थिक परिस्थिती या बाबींमुळे मिळकत कर भरला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मिळकतधारकांना वेळोवेळी थकीत बिलांवर दर महिना दोन टक्के दंड आकारला जातो. मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्याने मालमत्ता कराच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, थकीत मिळकतकराची रक्कम जास्तीत जास्त वसूल होण्यासाठी नागरिकांना कराच्या दंडामध्ये सवलत किंवा माफी दिल्यास मालमत्ता कराची वसुली होण्यास मदत होईल. महापालिका अधिनियमान्वये दंडाची रक्कम किंवा वसुलीचा खर्च आयुक्तांना आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार पूर्णत: किवा अंशत: माफ करता येईल, अशी तरतूद आहे. मालमत्ता कर थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये मिळकतधारकांकरिता सवलत देण्यासाठी अभय योजना राबविली जाते. (प्रतिनिधी)
कर सवलतीसाठी करणार जनजागृती
By admin | Published: February 01, 2016 12:34 AM