नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहरात १८ ते २५ मे दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे यांनी दिली आहे. नीरा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता मृत्यूदर ही वाढला आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शनिवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक झाली. यावेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे, सदस्य संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, अनंता शिंदे, प्रमोद काकडे, सुनील चव्हाण, मुनीर डांगे, सुजीत वाडेकर, जगन्नाथ जावळे, मंगेश ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, बाळासाहेब ननवरे, प्रकाश कदम, दत्तात्रय निंबाळकर आदी उपस्थित होते.
काकडे पुढे म्हणाल्या की, नीरा शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर मृत्यू दरही वाढतो आहे. याचा अतिरिक्त ताण आरोग्य प्रशासनावर येतो आहे. त्यातच नीरा शहराला लागून असलेल्या अनेक गावात कोरोना रुग्णसंख्या जास्त असून ती गावे हाय अलर्ट जाहीर झाली आहेत. त्याचबरोबर बारामती तालुका व सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने येथील अनेक लोक नीरा बाजार पेठेत गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. यामुळे पुढील काळात जनता कर्फ्यू पाळणे गरजेचे असून येत्या मंगळवारपासून पुढील मंगळवारपर्यंत नीरा बाजारपेठ बंद असेल.
नीरासह परिसरातील बहुतांश गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परिसरातील पाच गावे हाय अलर्ट जाहीर केली आहेत. बहुतेक रुग्ण होम क्वारंटाईन आहेत, पण त्यांच्या कुटुंबातील लोक नीरा बाजारपेठेत अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने येत असतात. त्यांच्या मुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे.
राजेश काकडे, उपसरपंच नीरा, ग्रामपंचायत
कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मोकाट फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून अशा लोकांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
कैलास गोतपागर, पोलीस उपनिरीक्षक
नीरेतील कोरोनाची स्थिती
कोरोना बाधित रुग्ण : एक हजार १८५
सक्रिय रुग्ण : १५९
मृत्यू : २६
कोरोनामुक्त : एक हजार
अत्यावश्यक सेवेतील काय चालू
दवाखाने, रुग्णालय, मेडिकल, पिठाची गिरण, दूध वितरण फक्त सकाळी सात ते नऊ.
अत्यावश्यक सेवेतील ही अस्थापने बंद
किराणा, फळ, भाजी, शेतीपूरक, पतसंस्था.