पुणे : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. यंदाच्या वर्षी आपण वारी, दहीहंडी हे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिवेशनसुद्धा रद्द केले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. तसेच गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे शहरासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधी वप्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी- चिंचवड मधील कोरोना बाधितबरुग्ण कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे ही खूप सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. परंतु, या संकटाचा धोका अजून संपलेला नसून सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी करताना कोरोना ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हे देखील महत्वाचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत.तसेच गणेश उत्सव देखील करण्यात यावा.त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही असेही पवार यांनी यावेळी अधोरेखित केले.