लोणीकाळभोर : एकाच्या दोन गुंठे मालकीच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्याने जाहीर नोटिसीचा लोखंडी बोर्ड लावून अनाधिकाराने अतिक्रमण केल्याची घटना उरुळीकांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी विनायक सुभाष कड ( वय ३९, रा. कड वस्ती, कोरेगावमूळ, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश तुकाराम बडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑगस्ट २०१३ रोजी विनायक व त्यांचा मोठा भाऊ चिंतामणी कड यांनी गोरक्षनाथ परबतराव खाकाळ ( वय ३७, रा. वाळके हॉस्पिटल, नेताजी चौक, औंध, पुणे यांच्याकडून भवरापूर रोड, उरुळीकांचन, ता. हवेली) येथील गट क्रमांक १२२० मधील ४ गुंठे क्षेत्र असे दोघांनी दोन-दोन गुंठे खरेदी केले. त्या जमिनीवर त्यांचा ताबा असून, त्या जागेवर त्यांनी तारेचे कुंपण केले आहे.
सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास विनायक कड व त्याचे सासरे विजय किसन दोरगे हे त्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यावेळी तेथे विनायक यांच्या जागेत लोखंडी बोर्डावर जाहीर नोटीस असल्याचे आढळले. त्यावर ही जागा मुकेश तुकाराम बडेकर यांच्या मालकी हक्काची असून या जमिनीवर कोणीही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे लिहिले होते. त्यामुळे त्यांच्या दोन गुंठे क्षेत्रामध्ये बडेकर याने अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.