पुणे : राजमाता जिजाऊंबरोबरच दादोजी कोंडदेव, समर्थ रामदासांच्या क्रीडाशिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराज घडले या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे असं त्यांनी नमूद केले. सिंह यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. कोल्हे यांनीही ट्विटर वरून व्हिडिओ पब्लिश करत निषेध केला आहे.
ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत.
इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे.
दोन दिवसापूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी :- संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास व दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले नाही. तसा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावं हीच 'संभाजी ब्रिगेड' ची मागणी आहे.