पुणे : कोरोनाची लागण शहरातील काही भागात सुरू झाल्याने प्रशासनाने तो भाग सील केला आहे. तसेच त्याठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र अनेकजण सकाळच्या वेळी वाहनांवर घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. दुपारी देखील शहराच्या मध्यवर्ती भागात काहीजण विनाकारण गाडीवर फिरत आहेत. पोलिसांनी सातत्याने आवाहन करून देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही भाग सील करण्यात आले आहेत. तर इतर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण सील केलेल्या भागात अजूनही कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. असे पाहणीतून दिसून आले. कर्फ्यु भागात शहरातील पेठांचाही समावेश आहे. त्यामध्ये सकाळच्या वेळेत नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. नाना पेठ, भवानी पेठ या भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पण लोकांना त्याचा काही फरक पडत नाही. पवळे चौकातून कुंभारवाडयाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच त्या भागात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. म्हणून या भागातील नागरिक रस्त्यावर येत नाहीत. पण अलीकडच्या भागात अजूनही नागरिकांची वर्दळ दिसून येते. तर सकाळच्या वेळेत भाजीपाला घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. अनेक गल्लीबोळ प्रवेश बंद केले असल्याने नागरिकांना एका गल्लीतून दुसरीकडे जाता येत नाही. त्यामुळे दोन दिवसापूर्वीच्या वर्दळीपेक्षा आजचे प्रमाण कमी होते. नाना पेठेतही रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व काही सील करण्यात आले आहे. या भागात दुपारी १२ ते २ यावेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. परंतु भाजीपाला मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक रात्रीच्या वेळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची धांदल उडत आहे. सायंकाळनंतर पोलिसांची नजर चुकवून नागरिक घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे
* लॉकडाऊन सर्वांनी घरात बसावे यासाठी करण्यात आले आहे. आता पुन्हा ते वाढवण्यात आले आहे. ते का यामागील कारणे जे अजूनही शिस्तीचे पालन करत नाहीत त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. विशेषत: तरुणांनी काळजी घ्यावी. आता वेळ सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची आहे. असे असताना आपली एखादी चूक सर्वांसाठी महागात पडू शकते. याचा विचार करायला हवा. - हरिभाऊ डोके (ज्येष्ठ नागरिक, )
* मंडई, दगडूशेठ परिसरातही सकाळच्या वेळेत नागरिक गाडीवर फिरताना दिसून आले आहेत. हा परिसर कर्फ्युमध्ये येत नसला तरी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस या भागातील नागरिकांना सातत्याने घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. तसेच गल्ल्यांमध्ये बांबू आणि लोखंडी रॉड टाकून प्रवेश बंद करण्यात आले आहेत. या गोष्टीला नागरिकाडून सहकार्य मिळत आहे.