पुणे : प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन कायम नजरेसमोर राहावे, या हेतूने निर्मित केलेल्या दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उद्योजक सतीश कुलकर्णी, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, रवींद्र खरे आणि मएसोचे सहाय्यक सचिव सुधीर गाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सतीश कुलकर्णी व निर्मित सामंत परिवार यांच्या वतीने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. ध्वनिचित्रफितीचे संहिता लेखन प्राजक्ता माडगूळकर यांनी केले असून, निवेदन गदिमांची पणती पलोमा माडगूळकर यांनी केले आहे. रवींद्र खरे आणि त्यांच्या सहका-यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
सतीश कुलकर्णी म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पाचा विचार सुरू होता. रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राकडून ही चित्रे उपलब्ध झाली आणि प्रकल्प साकार झाला. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय? हे जगभरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे.
सुमित्र माडगूळकर म्हणाले, महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात गदिमांचे स्मारक उभे राहात आहे. त्यातील एक दालन गीत रामायणासाठी राखीव असेल. या ठिकाणी रामायण अभ्यासकेंद्र व्हावे यासाठीही प्रयत्न राहील.अयोद्धेतील राममंदिराची एक तरी भिंत गदिमांच्या गीत रामायणाने भारलेली नक्कीच असेल.
भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून राहतात. रामायण आणि महाभारत हे खूप मोठे विषय आहेत, त्यांचा खूप अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
सुधीर गाडे यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------------------