पुणे : मनुष्य जीवनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, तरुणांनी हे वळण बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे. प्रवाह पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास आपण कोणत्या दिशेला जाऊ हे सांगता येत नाही, असे मत माजी सनदी अधिकारी राम प्रधान यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुण्यातील विभागीय केंद्रातर्फे राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडले. या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवृत्त सचिव सुधीर देवरे, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, अजित निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रधान म्हणाले, ‘या पुस्तकात माझ्या सेवाकाळातील घडामोडींचा समावेश आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. ‘माझी वाटचाल’ हे एका परीने माझ्या आणि बऱ्याच व्यक्तींच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. राजीव गांधी यांच्यासह गृहसचिव म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मात्र, राजभवनात जाण्याचा प्रवास अनपेक्षित होता.’सुधीर देवरे म्हणाले, ‘लवकरच १० आशियन देशांचे पंतप्रधान भारतात येणार आहेत. ‘लूक ईस्ट’ धोरणावर या वेळी चर्चा होईल. मात्र, ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थैर्य, शांतता, सुबत्ता नसेल तर या धोरणाला काहीच अर्थ उरणार नाही. व्यापार, संलग्नता आणि संस्कृती हा या धोरणाचा गाभा असून, यासाठी राम प्रधान यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे,’ असेही देवरे यांनी नमूद केले.अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले.
निर्भीड नोंदी हव्यात ‘देशाचा इतिहास लिहिताना भारत मागे पडला. चीन, युरोपमधील लोकांनी भारतीय इतिहासाचे बारकाईने लेखन केले आहे. काय झाले, काय घडले हे लिहून ठेवताना आपण संकोच करतो. सर्व नोंदी निर्भीडपणे लिहून ठेवल्यास पुढील पिढ्यांना इतिहास मार्गदर्शक ठरू शकेल’, असे सांगतानाच ‘यशवंतराव चव्हाण यांच्या महनीय कार्याचे योग्य मूल्यमापन करण्याची गरज आहे’, असेही प्रधान यांनी सांगितले.