पुणे : इशरत जहाँ चकमकीवर लिहिलेल्या पुस्तकाच्या जाहीर प्रकाशन कार्यक्रमाला पोलिसांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे संयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला. पुस्तक ऊर्दूतून असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले हाेते. मूलनिवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजूम इनामदार तसेच समाजवादी मंचचे अनिस अहमद यांनी ही माहिती दिली.
गुजरातमधील दंगलीत इशरत जहाँचे पोलिसांनी फेक म्हणजे बनावट एन्काउंटर केले असल्याचा आरोप आहे. ‘इशरत जहाँ एन्काऊंटर‘असे या पुस्तकाचे नाव आहे. मुंबईतील अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतच इशरत जहाँ यांची आई शमिमा कौसर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे जाहीर प्रकाशन केले. पुण्यात मात्र पोलिसांनी या प्रकाशन कार्यक्रमालाच हरकत घेतली. मंगळवारी (दि. २४) सकाळी साडेदहा वाजता महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्मारकात हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी संयोजकांनी २१ जानेवारीलाच महापालिकेकडे भाडे जमा केले. त्याची पावती घेतली. सभागृहाचे आरक्षण झाले असल्याची नोंद करून घेतली. खबरदारी म्हणून खडक पोलिस ठाण्यालाही त्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील प्रमुख वक्ते असल्याचे कळवले.
सर्व तयारी असतानाही रविवारी सकाळी संयोजकांना अचानक महापालिकेच्या कार्यालयातून फोन आला. त्यात त्यांनी तुमचे पुस्तक संवेदनशील आहे. त्यामुळे प्रकाशनासाठी दिलेले सभागृहाचे आरक्षण रद्द करण्यात येत आहे. तुमचे पैसे परत घेऊन जावे, असे सांगण्यात आले. त्याही आधी कॅम्पमधील एका सभागृहाच्या संयोजकाने याच कार्यक्रमासाठी केलेले आरक्षणही संबंधित खासगी हॉलच्या व्यवस्थापकांनी अचानक रद्द केले. त्यातून संयोजकांनी सभागृहासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सावित्रीबाई फुले स्मारकावर मंगळवारी दुपारपासून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
गुजरातची दंगल सन २००४ मध्ये झाली. त्यावरचे हे पुस्तक अलीकडेच मुंबईत प्रकाशित झाले. पुस्तकावर कसलीही बंदी नाही. त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. तो होऊ नये म्हणून कोण दबाव टाकत आहे, असा प्रश्न संयोजकांनी उपस्थित केला.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यात त्यांनी पुस्तक उर्दूत आहे, त्याची माहिती करून घेऊ, असे सांगितले. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या विषयावर करण्यात येणारे आंदोलन तूर्त स्थगित करत आहोत. मात्र, पोलिसांबरोबर पुन्हा चर्चा होणार असून, त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे अंजूम इनामदार व अनिस अहमद यांनी सांगितले.
कर्नल श्रीकांत पुरोहित याच्यावर मालेगाव बाॅम्बस्फोटसंबंधीचा खटला अजून सुरू आहे. न्यायालयाने त्याच्या युक्तिवादावर अलीकडेच ताशेरे मारले. त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचे काही महिन्यांपूर्वी एस. पी. कॉलेजमध्ये जाहीर प्रकाशन झाले. त्याला आम्ही विरोध केला होता. यातून त्याच्या न्यायप्रविष्ट खटल्याचे उदात्तीकरण होते असे आमचे म्हणणे होते. त्याकडे दुर्लक्ष करून पोलिस बंदोबस्तात हा कार्यक्रम घेण्यात आला. आता या पुस्तकाच्या कार्यक्रमाला विरोध करणे निषेधार्ह आहे.
- अंजूम इनामदार, अध्यक्ष, मूलनिवासी मुस्लीम मंच