पुणे : आपण जे काम केले ते सोपे काम आहे. मात्र समाजसेवा करणारा वर्ग शिल्लक राहिलेला नाही. दारू मटक्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता पक्षांनी निर्माण केला आहे. पण कार्यकर्ता हा आधारवड झाला पाहिजे. नेत्यांच्या नव्हे कार्यकर्त्यांच्या आवाजात ताकद आहे. शुभेच्छा फलकांमध्ये नेत्याचा फोटो टाकला म्हणजे कार्यकर्ता मोठा होणार नाही, अशी शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात सामान्य माणसाचे लहानसहान प्रश्न सुटले नाहीत. त्यासाठी कराव्या लागलेल्या आंदोलनांमध्ये प्रसंगी कधी हात उचलावा लागला. पण मारताना दु:ख होते. रक्तदान करणा-या कार्यकर्त्याला मारावे का लागते? हा प्रश्न आहे. हात उचलणारा मोठा होऊ शकत नाही तर देणाराच होतो. मी पक्षात गेलो नाही अन्यथा नेत्यांची गुलामी करावी लागली असती. मंत्रिपद महत्वाचे नाही पण राजकारण महत्वाचे आहे. आमदार म्हणून माझे राजकारण संपले तरी माझ्यातील सेवाभाव कधी संपू नये, अशी भावना त्यांनी नम्रपणे व्यक्त केली. जनजागृती प्रकाशनातर्फे नीलेश डावखरे आणि उद्धव ढवळे लिखित 'लोकनायक' बच्चू कडू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कडू बोलत होते. नयना कडू, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी आणि प्रकाशक राहुल वाळके या वेळी उपस्थित होते. गेल्या २५ वर्षात एक पत्रक काढण जमलं नाही पण या दोन लेखकांनी माझ्यावर पुस्तक काढले आहे. हे पुस्तक केवळ माझ्या एकट्याचे नाही तर सर्व कार्यकर्त्यांचे आहे, असे सांगून कडू पुढे म्हणाले, आईचा आवाज होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहेत. सामान्य माणसाबद्दल आस्था असेल तर बदल घडवता येतो. मनगटातील ताकद आणि मस्तकातील विचारांची जोड असेल तर कार्यकर्त्याला कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. आमदाराच्या वाटेपेक्षा रुग्णसेवकाचा मार्ग चांगला आहे. राजकारणातून सेवा झाली पाहिजे, सेवा आणि प्रामाणिकता महत्वाची आहे .पवार म्हणाले, सामाजिक भान असेल तर राजकीय व्यवस्थासुद्धा मदत करते हा अनुभव येतो. कडू यांच्या आंदोलनांमुळे अपंग आणि वंचितांसाठी अनेक कायदे झाले. सध्या गावे विस्थापित झाली असून सामावून घेण्याची शहरांची क्षमता संपली आहे. त्यामुळे आपले गाव सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याची शपथ युवकांनी घ्यावी. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी संघर्षात काम करणाऱ्याला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागते. तशी टीका कडू यांच्यावरही झाली. पण, त्यांना कामातील सातत्य सोडले नाही असे सांगून कडू यांनी महाराष्ट्राचा केजरीवाल होण्याकडे वाटचाल करावी अशी इच्छा प्रदर्शित केली. ..................कडू यांच्या क्षमतेवर विश्वाससंवेदनशीलता रचनात्मक कामात परावर्तित करण्याची क्षमता कडू यांच्याकडे आहे. त्यावर माझा विश्वास आहे, असे नयना कडू यांनी सांगितले. संघर्ष करणारा बच्चू कडू हा माणूस सेवा करण्यामध्ये असमाधानी आणि पैशाबाबत समाधानी असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नेत्याचा फोटो टाकला म्हणजे कार्यकर्ता मोठा होत नाही; बच्चू कडूंनी टोचले कार्यकर्त्यांंचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 4:09 PM
मनगटातील ताकद आणि मस्तकातील विचारांची जोड असेल तर कार्यकर्त्याला कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही : आमदार बच्चू कडू
ठळक मुद्दे 'लोकनायक' बच्चू कडू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्याच्या ७० वर्षात सामान्य माणसाचे लहानसहान प्रश्न सुटले नाहीत