पुणे : फुकट्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रशासनाकडून या प्रवाशांची माहिती प्रसिध्द करण्याचा विचार केला जात आहे. या प्रवाशांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक ही माहिती प्रसिध्द केल्यास फुकट प्रवास करण्याला आळा बसेल, असे रेल्वे प्रशासनाला वाटते. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होऊ शकते, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सुत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ८२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४ कोटी ६२ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. मागील काही वर्षात रेल्वेने या कारवाईसाठी विशेष पथकेही तयार केली आहेत. तरीही तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे. सातत्याने कारवाई करूनही आळा बसत नसल्याने रेल्वे प्रशासन त्रस्त झाले आहे.यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांना अद्दल घडविण्यासाठी त्यांची माहिती प्रसिध्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या प्रवाशांची छायाचित्रे, नाव, मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिध्दीमाध्यमांमध्ये प्रसिध्दीस देण्याचे विचाराधीन आहे. तसेच स्थानकांवरही ही माहिती लावली जाईल. या माध्यमातून संबंधित प्रवाशांवर वचक राहील. तसेच बदनामीच्या भितीने इतर प्रवासीही फुकट प्रवास करण्याचे टाळतील, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.---------तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देण्याचा विचार सुरू आहे. ही माहिती प्रसिध्द झाल्यास फुकट प्रवास करणे प्रवाशांकडून टाळले जाईल. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे
फुकट्या प्रवाशांची माहिती करणार प्रसिध्द : रेल्वे प्रशासनाचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 8:09 PM
प्रवाशांचे नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक ही माहिती प्रसिध्द केल्यास फुकट प्रवास करण्याला आळा बसेल,
ठळक मुद्देपुणे विभागाकडून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ८२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई