पुणे: वाचन कमी होत आहे असं म्हणण चुकीचं आहे. आॅनलाईनमुळे शहरी वाचक खूश झाला तरी ग्रामीण भागातील वाचकांना सहजगत्या पुस्तके उपलब्ध करून देणारी ग्रंथप्रदर्शने थांबली आहेत याची प्रकाशकांना खंत वाटत नाही.ग्रंथप्रदर्शने सुरू राहणे ही वाचक, लेखक आणि विक्रेते यांच्याबरोबरच प्रकाशकांचीही गरज आहे. आपल्या वातानुकूलन कक्षाबाहेर पडून प्रकाशकांनी वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी व्यक्त केली.
विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंचच्या ममता क्षेमकल्याणी यांनी राठिवडेकर दांपत्याची मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी या वेळी उपस्थित होते.
ढवळे ग्रंथयात्रेतील कर्मचारी आणि व्यवस्थापक ते अक्षरधारा बुक गॅलरीचे मालक असा रमेश राठिवडेकर यांचा प्रवास यावेळी उलगड्याणात अाला. ते म्हणाले, बालपणी आईचे निधन झाल्यानंतर काकूने सांभाळ केला. ढवळे ग्रंथयात्रेमध्ये काम करताना प्रदर्शन भरविलेल्या प्रत्येक गावात दररोज प्रत्येक माणूस मला नवीन काही शिकवत गेला. ढवळे यांनी केलेल्या चुकांमधून शिकलो आणि प्रकाशकांना वेळच्यावेळी पैसे दिले. तेथून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्ररित्या ग्रंथप्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली. छोटेसे दुकान आणि अक्षरधारा बुक गॅलरी साकारताना वाचकांची भरभक्कम साथ लाभली.वाचन कमी होते आहे हे म्हणणे चुकीचे आहे. प्रकाशक आणि वाचकांपर्यंत पुस्तक पोहचवणा-या यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. प्रकाशक काहीसे शिथिल, निरुउत्साही झाल्याने मी ग्रंथप्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला, तरी देखील एकाही प्रकाशकाने त्याबद्दल आस्थेने विचारपूस केली नाही. त्यांनी या निर्णया संदर्भात माझ्याशी थेट बोलण्याचे देखील कष्ट घेतले नाही. महाराष्ट्रातील तळागाळात पुस्तक पोहचवणारी प्रभावी आणि किफायतीर ग्रंथप्रदर्शन चळवळ बंद होत आहे तरी त्याबद्दल प्रकाशकांना त्याचे गांभिर्य नाही. ढवळे प्रकाशन संस्थेपासून सेवक म्हणून सुरु झालेल्या प्रवासापासून तिथला व्यवस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास, किस्से,अंगावर काटा आणणारे अनुभव यावेळी उलगडले. केवळ भिलार हे पुस्तकाचे गाव करून भागणार नाही. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करून ते दत्तक द्यावे, असे मत राठिवडेकर यांनी व्यक्त केले. वाचकांची मागणी म्हणून नारायण धारप यांच्या ‘ग्रहण’ पुस्तकाचे प्रकाशन केले. पण, हे माझे क्षेत्र नाही,याची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले.
ढवळे ग्रंथयात्रा इचलकरंजी येथे आली तेव्हा त्यातील कार्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था आमच्या घरी होती. त्यांच्यातील एक असलेल्या रमेशयांच्याशी विवाह होईल असे त्या वेळी वाटले नव्हते. एकदोनदा समोरासमोर भेट झाली. मग त्यांनी थेट विचारले आणि घरच्यांच्या परवानगीने आमचा विवाह झाला, अशी आठवण रसिका राठिवडेकर यांनी सांगितली. वाचकांचा आनंद हीच आमची दिवाळी असते, असेही त्यांनी सांगितले.