राहुल शिंदे-
पुणे : कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांवर सीईटी घेतली जाणार असली तरी त्यात नेमक्या कोणत्या घटकांवर सीईटी अवलंबून असेल याबाबत अद्याप राज्य मंडळाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. तत्पूर्वीच सीईटीसाठीची पुस्तके काही प्रकाशनांनी बाजारात आणली आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीईटीसाठी सराव करण्यासाठी प्रश्नसंच आवश्यक आहेत का? याबाबत सर्वेक्षण केले. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नसंच द्यावेत, असा अभिप्राय दिला. परंतु, शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर सुमारे १५० पानांची पुस्तिका काढण्याचा एससीईआरटीचा विचार आहे. तसेच किती विद्यार्थी सीईटीसाठी नोंदणी करतात, त्यानुसार पुस्तिका छापण्याचे निश्चित केले जाईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
-------------------
राज्य मंडळातील कामकाज अत्यंत गोपनीय पद्धतीने केले जाते. राज्य मंडळाने अद्याप कोणत्या घटकांवर सीईटी असेल हे स्पष्ट केले नाही. त्यापूर्वीच बाजारात पुस्तक येणे धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला सीईटीबाबत मार्गदर्शक पुस्तिका मोफत उपलब्ध करून द्यावी.
- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य