पुणे : पब, बारमधून सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका, उत्पादन शुल्क तसेच पोलिसांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या सर्व पब, बारचे स्पॉट मॅपिंग अर्थात ठिकाणे निश्चित करून संयुक्त कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट होत असल्यास ठरावीक वेळेनंतर ते बंद करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर व्यवहार्यताही तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्येही अमली पदार्थांचे सेवन झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत दिवसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पब, बारमधील मद्य विक्रीबाबत महापालिका, पोलिस तसेच उत्पादन शुल्क विभाग या तीन यंत्रणा काम करतात. उत्पादन शुल्क विभागाकडे तुलनेने मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिन्ही यंत्रणांचा समन्वय ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांना याबाबत एकत्रित बैठकीसाठी विनंती करण्यात आली आहे.
येत्या आठवडाभरात याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. तसेच शुक्रवारी व शनिवारी संयुक्त कारवाई करताना समन्वय ठेवण्यात येणार आहे. तसेच निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे ऑनलाइन पेमेंट गेटवे बँकेमार्फत बंद करता येईल का, याबाबतही कायदेशीर व्यवहार्यता तपासण्यात येईल.”