पुणे : बँकेतून पैसे काढून दुचाकीवर निघालेल्या दूध संस्थेच्या सचिवाला मारहाण करून लुटल्या प्रकरणी कोल्हापूर येथील काडय्या पुजारी टोळीच्या म्होरक्यासह दोघांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिले. काडय्या शिवलिंगय्या पुजारी (रा. बस्तवाड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि कल्लाप्पा बाळाप्पा मेलमट्टी (रा. इंगळी ता. हुक्केरी जि. बेळगाव) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींचे नावे आहेत. इरय्या चंदय्या मटपती (वय ३२), गुलाबसाहब आप्पासाहब मुलतानी (वय ५५), मेहबुब बाबालाल मुलतानी (वय २७, तिघेही रा. हुक्केरी, बेळगाव), परशुराम ऊर्फ परसु केंचाप्पा मांग (वय ३६, बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज, कोल्हापूर) यांच्यावरही मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी त्यांची कोठडी घेतली होती. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. बाळू महादेव राजगोळे (वय ३५, रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंंग्लज, कोल्हापूर) यांनी नेसरी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लिंगनूर ते मुंगूरवाडी येथील महादेव मंदिराजवळ घडली. काडय्या याच्यावर कर्नाटक येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर कोल्हापूर पोलिसांकडे जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याची कर्नाटक राज्यात दहशत आहे. तर कल्लाप्पा मेलमट्टी याच्यावर कर्नाटक येथील विविध पोलिस ठाण्यात सात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात एक गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राजगोळे महालक्ष्मी दूध संस्थेत सचिव म्हणून काम करतात. त्यांच्या सोबत असलेले मित्र दत्तू गंगाजी पाटील हे हनुमान दूध संस्था, गुडलकोप बुगडीकट्टी या संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही दूध संस्थेचे खाते हेब्बाळ-जळद्याळ येथील बँक आॅफ इंडियामध्ये आहे. बँकेत कामकाजासाठी दोघे एकाच दुचाकीवरून ये-जा करत असतात. घटनेच्या दिवशी बँकेतून ३ लाख ७० हजार रुपयांची रक्कम काढून परतत असताना लिंगनूर ते मुंगूरवाडी येथील रोडवर आरोपींच्या टोळीने भर दुपारी त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांच्याकडील ३ लाख ७० हजारांची रक्कम लुटली.टोळीच्या म्होरक्यासह दोघांना पुणे शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडील चोरीची रक्कम हस्तगत करायची आहे. गुन्हा केल्यानंतर दोघे कोठे फरार झाले होते ? याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
पुजारी टोळीचा म्होरक्या काडय्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 7:56 PM
काडय्या याच्यावर कर्नाटक येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर कोल्हापूर पोलिसांकडे जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याची कर्नाटक राज्यात दहशत आहे.
ठळक मुद्देमोक्का न्यायालय : कर्नाटक-कोल्हापूर परिसरात घरफोडी-जबरी चोरीचे अनेक गुन्हेआरोपींच्या टोळीने भर दुपारी त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांच्याकडील ३ लाख ७० हजारांची रक्कम लुटली.