- प्रज्ञा केळकर-सिंग- पुणे : प्रसिध्द काश्मीरी कवी गुलाम अहमद मेहजूर यांचा जन्म पुलवामा जिल्ह्यातील मिट्टीग्राम या गावातला. या जिल्ह्याला पुलवामा साहित्य, संस्कृती आणि कलेची परंपरा आहे. मात्र, गेल्या दोन-अडीच वषार्तील घटना पाहता पुलवामा हे दहशतवादाचे केंद्र होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पुलवामामध्ये पुस्तकांचे गाव साकारण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेतर्फे जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना देण्यात आला आहे. निवडणुकांचा काळ असल्याने जून महिन्यापासून हा प्रकल्प कार्यान्वित करता येईल, असे आश्वासन राज्यपालांकडून देण्यात आले आहे. मेहजूर यांच्या कविता सामाजिक ऐक्य, एकात्मता, प्रेमाचे नाते सांगणा-या होत्या. त्यांनी कष्टकरी, शेतकरी यांच्या वेदनाही कवितेत शब्दबध्द केल्या. त्यांना जम्मू काश्मीरचे वर्ड स्मिथ म्हणून संबोधले जाते. त्यांचे जन्मगाव कला, साहित्य, संस्कृतीचे केंद्र म्हणून उदयाला यावे, यादृष्टीने सरहद संस्थेने पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव आणि नियोजन अहवाल तयार केला. त्यावेळी मुफ्ती अहमद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यासह बैैठकही होऊन सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, काही कारणाने हा प्रकल्प त्यावेळी रखडला होता. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे. या पार्श्वभूमीवर दहशतावादाचा बीमोड होऊन सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, यासाठी पुस्तकांच्या गावांचा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासंदर्भात जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.नहार म्हणाले, सरकार संरक्षणावर खर्च करते, त्याप्रमाणे सामान्य नागरिकांची सांस्कृतिक भूकही जाणून घेण्याची गरज आहे. पुलवामा पैैलग्रामच्या रस्त्यावर असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकते. नियोजन अहवालानुसार, महजूर यांचे स्मारक उभारावे, उद्यानांमधील झाडांना साहित्यिक, शास्त्रज्ञांची नावे द्यावीत, तेथे कवितांचे, कथावाचनाचे कार्यक्रम व्हावेत, शाळांच्या सहली याव्यात, भारतीय भाषांमधील साहित्याचे आदानप्रदान व्हावे, असे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला महजूर यांचे स्मारक उभारावे अशी कल्पना तयार करण्यात आली होती. कालांतराने महाराष्ट्रामध्ये भिलारला पुस्तकांचे गाव साकारले, त्याप्रमाणे पुलवामा येथे पुस्तकांचे गाव साकारले जाईल, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार, शासनाशी बोलणे झाल्यानंतर शासनातर्फे निधी उभा केला जाईल आणि सरहदतर्फे या संकल्पनेला मूर्त रुप दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. सध्या लोकनियुक्त सरकार नसल्याने या प्रकल्पाना आडकाठी येऊ शकते. त्यामुळे निवडणुकांनंतर जून महिन्यापासून प्रकल्पाला सुरुवात करता येईल, असे राज्यपालांकडून सांगण्यात आले आहे.......पुस्तकांच्या गावाच्या माध्यमातून कट्टरवाद कमी होऊन पुलवामा जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ उभी राहू शकते. तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. यातून विकासाला चालना मिळेल. केंद्र शासनानेही या प्रकल्पामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. - संजय नहार, संस्थापक, सरहद
पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 1:33 PM
गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे....
ठळक मुद्देपुस्तकांचे गाव साकारणार : सरहद संस्थेतर्फे राज्यपालांना प्रस्तावसरकार संरक्षणावर खर्च करते, त्याप्रमाणे सामान्य नागरिकांची सांस्कृतिक भूकही जाणून घेण्याची गरज