पुणे : मुळा-मुठेच्या संगमावर बोटीतून केलेली थरकाप उडवणारी प्रात्यक्षिके, आकाशात होणारी आतषबाजी, त्यात होणारा विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजराने दिलेला प्रतिसाद,अश्या वातावरणात पुणेकरांनी लुटला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिगाटा या महोत्सवाचा आनंद. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने गेल्या ९० वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकर रसिकही आवर्जुन हजेरी लावतात. मुळा-मुठाच्या संगमावर, संगमवाडी येथील नदी पात्रात या महाेत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी या महोत्सवाची तयारी करत होते. रविवारी झालेल्या या महोत्सवात ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध प्रकारच्या बोटींच्या सहाय्याने नदीमध्ये विविध आकार तयार करण्यात आले. यंदा, भारताचा संपूर्ण इतिहास, इंग्रजांनी भारतावर केलेले आक्रमण ते विविध जातींमध्ये विभागलेला समाज. आणि या समाजाला जाती-पातीच्या पलिकडे एकसंथ बांधण्याचा विचार या प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला. विद्यार्थी जीवाची बाजी लावून प्रात्याक्षिके करत होते. त्याचबरोबर प्रात्याक्षिकांना साजेशी अशी आताषबाजी यावेळी करण्यात येत होती. नदीमध्ये लावलेल्या आगीचे प्रात्याक्षिके पाहताना प्रेक्षक भारावून गेले होते. बोटींची टक्कर होणार नाही याची काळजी घेत अंधारात विद्यार्थी आपली कला दाखवत होते. संगमवाडी पुलावर उभे राहूनही अनेक नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.
या महोत्सवामध्ये एकूण पाच विविध प्रकारची प्रात्याक्षिके केली जातात. त्यातील चार ही पाण्यात केली जातात, तर एक प्रात्याक्षिक नदीच्या दुसऱ्या बाजूला केले जाते. या प्रात्याक्षिकामध्ये मशाल डान्स केला जातो. यासाठी जुन्या मशालींचा वापर केला जातो. या महोत्सवाच्या व्यतिरिक्त इतर वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बोट क्लबच्या माध्यमातून विविध स्पर्धांची वर्षभर या ठिकाणी तयारी करण्यात येते. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिकेही मिळवली आहेत.