पिंपरी : पुनावळे येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात रविवारी सकाळी बाईक रॅली काढली. पुनावळे, मारुंजी, ताथवडे, जांबे, हिंजवडी, वाकड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी चिपको आंदोलन केले. पुनावळे आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे... कचरा डेपो हटाव...पुनावळे बचाव... अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्येसहभाग घेतला.
पिंपरी - चिंचवड महापालिकेने पुनावळे मधील काटेवस्ती येथे असलेल्या जंगल परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वनविभागाची २६ हेक्टर जागा महापालिकेला मिळाली असून सन २००८ मध्ये या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. मोशी येथील कचरा डेपो भरल्याने महापालिकेने कचरा डेपोसाठी ही पर्यायी सोय केली आहे. मात्र, या प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूला पूर्णपणे नागरी वस्ती झाली आहे. दाट लोकवस्ती असल्याने इथे कचरा डेपो करू नये, अशी पुनावळे, ताथवडे, मारुंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे.बाईक रॅली चिपको आंदोलन पुनावळे येथे हा प्रकल्प जंगल तोडून उभारण्यात येणार असल्याने इथली नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होईल, तसेच, नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, यासाठी हे आंदोलन केले. याच मागणीसाठी पिंपरी - चिंचवड को-ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्यावतीने रविवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. पुनावळे आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे... कचरा डेपो हटाव...पुनावळे बचाव... अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. १८ लॅटीट्यूड मॉल पुनावळे येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पुढे कोयते वस्ती, शिंदे वस्ती, लाईफ रिपब्लिक सोसायटी मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, ताथवडे सर्व्हिस रोड, पुनावळे, कोयते वस्ती मार्गे काटे वस्ती येथील जंगल परीसरात आली.जंगलातील प्रत्येक झाडालाआलिंगन देत नागरिकांनी चिपको आंदोलन केले. कचरा डेपो करण्यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे इथल्या निसर्गाचा र्हास होणार असल्याने हा विरोध करण्यात आला. महापालिकेने सन २००८ साली या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले. मात्र, त्यावेळी या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. आता प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात लाखो नागरिक वास्तव्यास आले आहेत. प्रस्तावित कचरा डेपोपासून काही मीटर अंतरापर्यंत सोसायट्या झाल्या आहेत. त्यामुळे इथे कचरा डेपो सुरु झाल्यास इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.