पुणे : एकेकाळी पुनवडी म्हणून छोटेसे असणारे गाव आता पुणे महानगर झाले आहे. पुण्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या महापालिकेच्या स्थापनेअगोदर येथे नगरपालिका होती. याचा कारभार विश्रामबाग वाड्यातून केला जात होता. नगरपालिकेचे नंतर महापालिकेत रूपांतर झाले. या शहराचा नगरपालिका ते महापालिका प्रवास म्हणजे देदीप्यमान इतिहास आहे.
पुणे हे विघेचे माहेरघर. विचारवंताचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात जे खपते ते देशभर विकले जाते, असा लौकिक. पुणे नगरपालिकेची स्थापना १ जून १८५७ रोजी झाली. त्यापूर्वी पुण्यात नगरपालिका होती. या नगरपालिकेेचे महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गाेखले, न. चिं. केळकर, आचार्य अत्रे हे सभासद होते. पुणे महापालिकेची स्थापना १५ फेब्रुवारी १९५० रोजी करण्यात आली. पुणे नगरपालिकेचे पहिले कार्यालय विश्रामबाग वाडा येथे होते.
नगरपालिकेचे पुणे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर कार्यालयही विश्रामबाग वाडा येथेच होते. त्यानंतर शिवाजीनगर येथील जागेत सध्याच्या महापालिका भवन हे कार्यालय बांधण्यात आले. तेव्हापासून पालिकेचे हे कार्यालय तेथे आहे. महापालिकेच्या स्थापनेला तब्बल ७३ वर्षे झाली.
या दिग्गजांनी भूषविले महापौरपद
पुणे शहराचे महापौरपद हे अत्यंत सन्मानाचे मानले जाते. अनेक दिग्गज व्यक्तीने महापौरपद भूषविले आहे. त्यात बाबूराव सणस, भाउसाहेब शिरोळे, भाई वैद्य, गणपतराव नलावडे, वासुदेव गोगटे, शिवाजीराव ढेरे, बाबूराव जगताप, ना. ग. गोरे, निळभाऊ लिमये, वसंत थोरात, शिवाजीराव भोसले, वि. भा. पाटील, दिवाकर खिलारे यांचा समावेश होता.
महापौर अन् उपमहापौरपद भूषविलेली एकमेव व्यक्ती
पुणे शहराचे महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भूषविण्याचा मान अली सोमजी यांना मिळाला. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत ही दोन्ही पदे भूषविलेली ही एकमेव व्यक्ती आहे.
नगरसेवक ते खासदार
पुणे महापालिकेच्या नगरसेवकपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेले अनेक जण खासदार पदापर्यंत गेले आहेत. त्यात अण्णा जोशी, विठ्ठलराव तुपे, गिरीश बापट, अनिल शिरोळे, वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
भोसले, शिरोळे घराणे
नगरपालिकेच्या स्थापनेपासून पुणे महापालिकेपर्यंत भोसले आणि शिरोळे या घराण्यातील व्यक्तींनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोन्ही घराण्यांचा शहराच्या विकासात मोठा हातभार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
यांनी भूषविले मंत्रिपद :
नगरसेवकपदापासून राजकीर्य सुरू करून अनेक आमदार झाले. त्यानंतर मंत्री होऊन राज्याचे नेतत्वही केले. त्यात भाई वैद्य, चंदकांत छाजेड, शशिकांत सुतार, गिरीश बापट, रमेश बागवे, बाळासाहेब शिवकर यांचा समावेश आहे. वैद्य, छाजेड, बागवे, शिवकर हे राज्यमंत्री, तर सुतार, बापट कॅबिनेट मंत्री होते. मुक्ता टिळक, चंद्रकांत मोकाटे, भीमराव तापकीर, महादेव बाबर, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, बापू पठारे, कमल ढोले पाटील, सुनील टिंगरे, चेतन तुपे हे आमदार झाले.
‘मेयर’ झाले महापौर
स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांना मानणारे गणपतराव नलावडे पुणे शहराचे ‘मेयर’ झाले, हे कळल्यावर दोन दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र आले. त्यात मेयरऐवजी ‘महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो, असे म्हटले होते. सावरकरांचे पत्र मिळाल्यावर पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे यांनी ‘मेयर ऑफ पुणे’ची पाटी काढायला लावली. तिथे ‘महापौर’ची पाटी लावण्याचे आदेश दिले. तेव्हापासून महापौर शब्द रूढ झाला.