भोर तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आंब्यासह फळबागा,घराचे छप्पर उडाले पाॅली हाऊस, पीठ गिरणी पोल्ट्री शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत आणि पंचनाम्यांचा अहवाल शासनाला पाठवण्याच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार, कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात होणार आहे.
दरम्यान काल उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी आंबवडे खोऱ्यातील टिटेघर, वडतुंबी, चिखलगाव गावात वादळी वऱ्यामुळे नुकसान झालेल्या गोठे पोल्ट्री फार्मची पाहणी केली. या भागातील तलाठी मंडल अधिकारी कृषी सहायक सदर नुकसानीची पाहणी करून पंचनामे करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.
दरम्यान काल भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबडखिंड घाटात वादळी वाऱ्यासह पावसामुळे डोंगरातील दरड कोसळून तीन चार मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीपीच्या मदतीने दगड बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.