पुणे - कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना मृतदेहावर डिझेल टाकत असतानाच अचानक भडका उडून त्यांच्या हातातील कॅनही उडाली. त्यामुळे जवळ असलेले ११ जण भाजले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
दीपक कांबळे (वय ४०, रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड) यांनी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परिसरातील ३०० ते ४०० नागरिक जमले होते. कैलास स्मशानभूमीत एका कोपऱ्याच्या बाजूला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. शेवटचा अग्नी देत असताना अनिल शिंदे हे डिझेल टाकत होते. अचानक भडका उडाला. त्यांच्या हातातून कॅन सुटली व त्याचा स्फोट होऊन बाजूला उभे असलेले ११ जण भाजले. त्यात मृत्यू पावलेल्यांची आई व मामेसासू यांचा समावेश आहे.
आशा प्रकाश कांबळे (वय ५९, रा. घोरपडी गाव), येणाबाई बाबू गाडे (वय ५०, रा. घोरपडीगाव), नीलेश विनोद कांबळे (वय ३५), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी (वय ५५, रा. ताडीवाला रोड), वसंत बंडू कांबळे (वय ७४, चिंचवड), दिगंबर श्रीरंग पुजारी (वय ४०, रा. घोरपडीगाव), हरीश विठ्ठल शिंदे (वय ४०, रा हडपसर), आकाश अशोक कांबळे (रा. मुंढवा), शशिकांत कचरू कांबळे (वय ३६, रा. प्रायव्हेट रोड), अनिल बसन्ना शिंदे (वय ५३, रा. प्रायव्हेट रोड), अनिल नरसिंग घटवळ (रा. ताडीवाला रोड) अशी जखमींची नावे आहेत.
माजी महापौर रजनी त्रिभुवन थोडक्यात बचावल्यामाजी महापौर रजनी त्रिभुवन अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळेस आगीची झळ एका व्यक्तीला बसली. त्याच्या हाताला आग लागली. जवळ उभ्या असलेल्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच्या साडीचा आधार त्या अपघातग्रस्त व्यक्तीने घेतला. आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या साडीचा पदर पेटला. त्यामुळे त्रिभुवन यांचा हात भाजला. तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला दूर ढकलले. त्रिभुवन यांना थोडी दुखापत झाली आहे, त्यांनी उपचार घेतले असून, त्यांची तब्येत ठीक आहे.