विशाल शिर्के पुणे : रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ्याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. यातील १२ परवाने गेल्या वर्षभरात रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत हजारोटन धान्यसाठा आणि सुमारे १३ हजार लिटर केरोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.शिधापत्रिकाधारकांना २ रुपये किलो दराने गहू, ३ रुपये किलो तांदूळ आणि केरोसिन १५.४५ रुपये लिटर दराने मिळते. सध्या शहरातील केरोसिनचा कोटा पूर्ण रद्द केला आहे. एफडीओच्या भरारी पथकाने दुकानांची अचानक तपासणी केल्यावर मिळालेले आणि शिधापत्रिकाधारकांना वितरीत केलेले धान्य याचा मेळ काही लागत नाही. त्यावरुन संबंधित दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केल्याचे निष्पन्न होते. अनेकदा पोलिसांच्या कारवाईतही काळाबाजार करणारे समोर येतात. त्या नुसार एफडीओ कार्यालयाकडून परवाना रद्दची अथवा दंडात्मक कारवाई केली जाते.गेल्या सात वर्षांत अशा जवळपास अडीचशे रेशनिंग दुकानांवर कारवाई झाली असून, त्यातील ११२ दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही माहिती उघड केली आहे.कारवाईतही तफावतपरिमंडळ ड मधील काकासाहेब महादेवराव कांबळे यांच्या दुकानात २५६ किलो गहू अणि ७.५३ किलो तांदळाची तफावत आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र, गजानन डी बाबर या ज परिमंडळातील परवानाधारकाकडे ३०० किलो तांदळाची तफावत आढळूनही त्यांना केवळ ९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अ परिमंडळातील बी. डी. औसरमल या परवानाधारकाने २२ क्विंटल गहू आणि १९ क्विंटल तांदळाची तफावत आढळली असून, त्यांना १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, त्यांचा परवाना रद्द झाल्याची नोंद कागदपत्रात आढळून येत नाही.
पुणे : काळा बाजार करणा-या ११२ दुकानांचे परवाने रद्द, हजारो टनचा धान्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:32 AM