पिंपरी :पुणेरेल्वे प्रशासनाने मार्चमध्ये केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २६ हजार ३७४ जणांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून २ कोटी १४ लाख रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे स्पष्ट होत आहे.
रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा फ्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्लासचे तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करणे अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते. पुणे विभागातून दररोज शेकडो रेल्वे धावतात. यामध्ये पुणे स्टेशनहून धावणाऱ्या रेल्वेंची संख्या मोठी असून देशाच्या विविध भागात प्रवाशांची ये-जा असते. या रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने पुणे विभागात मार्च महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २६ हजार ३७४ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सेकंड क्लासचे तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करताना म्हणजेच अनियमित प्रवास करणाऱ्या ८,५४६ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ५१ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वेने साहित्य वाहतूक करताना त्याची बुकिंग करणे अपेक्षित आहे. विनाबुकिंग माल, साहित्य वाहतूक करणाऱ्या २३३ जणांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. त्यांच्याकडून ३४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
अकरा महिन्यांत २७ कोटी वसूल
रेल्वे प्रशासनाने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या अकरा महिन्यांत तब्बल २७ कोटी ८४ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. यामध्ये फुकट्या प्रवाशांसह इतर नियमभंग करणाऱ्यांचा समावेश आहे.
रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल बुडून पर्यायाने रेल्वेला तोटा सहन करावा लागतो. यामुळे अशा फुकट्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातील वरिष्ठांनी दिले होते. यानुसार पुणे विभागात ही कारवाई करण्यात आली.
- मिलिंद हिरवे, वाणिज्य प्रमुख, पुणे विभाग