पुणे : ‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०१७ ते ११ जानेवारी २०१८ दरम्यान घडली.
या प्रकरणी डॉ. प्रतिभा भजनदास श्यामकुंवर (वय ५५, रा़ आस्था सोसायटी, फुगेवाडी, दापोडी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतिभा श्यामकुंवर यांची फेसबुकवर माईक नावाच्या इसमाशी ओळख झाली होती. तोदेखील अमेरिकेत डॉक्टर असल्याचे प्रतिभा यांना त्याने भासवले होते. एवढंच नव्हे तर मी चॅरिटीचे काम करतो, असे सांगत त्याने डॉ. प्रतिभा यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर, १३ डिसेंबर २०१७ रोजी आणि ११ जानेवारी २०१८ या दरम्यान अमेरिकेवरून महागडे पार्सल पाठविले आहे़ त्यात युरो, डॉलर व दागिने असल्याचे त्याने सांगितले़ त्यानंतर त्याने हे पार्सल दिल्लीत कस्टमने अडकवून ठेवल्याचे सांगितले़ ते सोडवण्यासाठी बिहार आणि दिल्ली येथील बँकेत पैसे पाठविण्यास सांगितले होते. यासाठी दिल्ली येथील कस्टम आॅफिसर आणि आरबीआय या आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगून मोबाईलवरून संबंधित व्यक्तीने त्यांना बँकखाते क्रमांक दिले. त्यानुसार डॉ़ प्रतिभा यांनी आपल्याकडील तसेच इतरांकडून उसने पैसे घेऊन या बँक खात्यात पैसे भरले. इतके पैसे भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने व ते फोन आता लागत नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.