दुसरा डोस देण्यास झाली सुरुवात : साडेसहा हजार पोलिसांना लसीकरण
पुणे : शहर पोलीस दलात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु आहे. शहर पोलीस दलातील साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शहर पोलीस दलातील ७७ टक्के पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला असून आता दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
शहर पोलीस दलातील १ हजार ५३० पोलीस बाधित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीस लागला आहे. शहरा पोलीस दलातील ४२ पोलीस बाधित झाले आहेत. त्यापैकी १६ पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित २६ पोलीस कर्मचारी वैदयकीय तज्ञांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
करोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असून आतापर्यंत साडेसहा हजार पोलिसांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ८४ पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. काही पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ते बाधित झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जाणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
........
करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.
..........
शास्त्री रस्त्यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आंदोलनाच्या ठिकाणी विशेष शाखेतील दोन पोलीस अधिकारी तसेच तीन कर्मचारी करोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कातील पोलीस कर्मचार्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
........
शहर पोलीस दलातील पोलिसांची संख्या - ८५००
लस घेतलेले पोलीस - ६६२४
.........
८४ पोलिसांनी घेतला दुसरा डोस
पुणे पोलीस दलात लसीकरण सुरु झाल्यानंतर आता दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली असून ८४ पोलिसांना आतापर्यंत दुसरा डोस देण्यात आला आहे.