- नितीश गोवंडेपुणे : पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय विधवा महिलेकडे अष्टेकर यांनी लैंगिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आयपीएस नीलेश अष्टेकर यांनी महिलेला फेसबुक मेसेंजरवर संदेश पाठवून पुण्यात आयपीएस अधिकारी म्हणून काम करतो अशी ओळख सांगितली आणि तिला पोलीस दलात भरती व्हायचे आहे का अशी विचारणा केली. तेव्हा तिने तिच्या बहिणीचा मुलगा पोलिस प्रवेश परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगितले. मुंबई पोलिस भरती मोहिमेत तो नापास झाल्याचे तिने सांगितले असता अष्टेकर यांनी तुझ्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळेल याची खात्री देतो असे सांगत तिचा नंबर घेतला. आपल्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळावी, अशी इच्छा असल्याने ती महिला अष्टेकरच्या संपर्कात होती.
दरम्यान अष्टेकर यांनी व्हॉट्सअप मेसेज आणि फोनद्वारे अनेकदा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करत अश्लील मेसेज पाठवले तसेच अश्लील व्हिडिओच्या लिंक देखील पाठवल्या. त्यानंतर अष्टेकर याने महिलेला व्हॉट्सअप कॉल करून अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला तिच्या मुलीला त्याच्याकडे पाठवण्यास सांगितले. हा सगळा प्रकार बघता महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार केली. अष्टेकर हे त्यांच्या राहत्या घरातून व कार्यालयातून तिच्याशी संवाद साधत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या आधारे अष्टेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नारायण शिरगावकर हे करत आहेत.