पुणे : बाणेर परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण या चिमुरड्याला बुधवारी दुपारी पुनावळे येथे सुखरूप सोडण्यात आले. अपहरण झालेल्या ठिकाणापासून हे ठिकाण अवघे १० किलोमीटर अंतरावर असून, गेले ८ दिवस स्वर्णवला याच परिसरात अपहरणकर्त्यांनी ठेवले होते.स्वर्णव ११ जानेवारी रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास डे केअरला जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याचे अपहरण केले होते. डॉ. सतीश चव्हाण यांचा हा मुलगा असून, त्याच्या अपहरणानंतर खंडणीसाठी कोणताही फोन आला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. मात्र तो सुखरुप घरी पोहोच केल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
असा सापडला स्वर्णव पुनावळे येथील पाण्याच्या टाकीसमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दादा राव हे सुरक्षारक्षक आहेत. तेथे दुपारी चेहरा झाकलेला एक जण लहान मुलाला घेऊन आला. मुलाला तुमच्याजवळ ठेवा, १० मिनिटांत येतो, असे सांगून तो निघून गेला. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यावरही तो तरुण आला नाही. मुलगा रडायला लागला तेव्हा इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तरुणांनी मुलाकडील बॅग पाहिल्यावर त्याच्या बाजूला एक मोबाइल नंबर लिहिलेला दिसला. त्यावर त्यांनी फोन केल्यानंतर तो डॉ. चव्हाण यांचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी व्हिडिओ कॉल करून मुलगा दाखविल्यावर पोलीस अधिकारी आणि डॉ. सतीश चव्हाण व काका सचिन चव्हाण हे तेथे पोहोचले व त्यांनी मुलाला ताब्यात घेतले.
अपहरणकर्त्यांचा शोध सुरूमुलाची तब्येत व्यवस्थित आहे. अपहरणकर्त्यांविषयी काही धागेदोरे मिळाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
सर्वांचे आशीर्वाद मिळाल्याने आमचे बाळ सुखरूप घरी आले आहे. मुलगा नऊ दिवस आमच्यापासून दूर होता, त्यामुळे त्याला स्थिर होण्यास थोडा वेळ जाईल. माध्यमे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो.- डॉ. सतीश चव्हाण, मुलाचे वडील