Ambadas Danve ( Marathi News ) : भरधाव वेगाने कार चालवून दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आमदार टिंगरे यांनी अपघातानंतर पोलीस ठाण्यात जात आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल होऊ नयेत, यासाठी पोलिसांवर दबाव आणला, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
अंबादास दानवे यांनी सुनिल टिंगरे यांच्या भूमिकेवरून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. "आमदार सुनिल टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे! तुम्ही का गेले होतात पोलिस ठाण्यात मध्यरात्री? एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोचला आहात? प्रकरणाची माहिती अनेकदा फोनवर घेतली जाते. अशा वेळी यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते? या प्रश्नांची उत्तरे आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यायला हवीत," अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, "पुण्यातील अपघात दुर्घटनेत पुणे पोलीस आयुक्तांनी लावलेल्या कलमांची कसून चौकशी करण्यात यावी. पुण्यातील उच्चभ्रू रहिवासी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब सुरू आहेत. विद्येचे हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख पबचे पुणे होऊ लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असताना त्यांना या पब मालकांकडून विविध 'पॅकेज' पुरविली जातात," असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.
सुनिल टिंगरे यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे?
चहूबाजूने टीकेचा भडीमार होऊ लागल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी आपली बाजू मांडत म्हटलं आहे की, "राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करतो. रात्री तीन वाजून २१ मिनिटांनी माझ्या पीएचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीही मला फोनवरून माहिती दिली. तसेच विशाल अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. मी पोलिस स्टेशनला पोहचलो. त्यानंतर पोलिसांनी मला माहिती दिली. यावेळी मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितली. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो. मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलीय. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी अगरवाल यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. मी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी करतो आहे," अशा शब्दांत टिंगरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.