डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:42 PM2024-05-28T14:42:14+5:302024-05-28T14:57:17+5:30
Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्हायरल होत असलेल्या शिफारपत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
MLA Sunil Tingre : पुण्याच्या कल्याणीनगर भागात व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांची हत्या केली होती. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव सुरुवातीपासून जोडलं जात होतं. अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर आता आरोपीच्या रक्ताचे नमुने बदणाऱ्या डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी पत्र दिल्याने टिंगरे पुन्हा चर्चेत आले. मात्र आता डॉ. अजय तावरे यांच्या शिफारस पत्राला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे.
दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि त्याऐवजी दुसऱ्याच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवून देण्यात आले. दोन्ही नमुन्यांमधील डीएनए जुळत नसल्याने ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर या प्रकरणात सुरुवातीपासून चर्चेत असलेले सुनील टिंगरे यांचे पुन्हा एकदा नाव पुढे आले. सुनील टिंगरे यांनी डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठीचे शिफारस केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. याप्रकरणी आता सुनील टिंगरे यांनी भाष्य केलं आहे.
डॉ. सुनील तावरेंची ससून हॉस्पिटच्या अधिक्षकपदी नियुक्ती करा असं पत्र राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलं होतं. तसेच तावरेंना एका आमदाराचा फोन देखील आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मात्र आता याप्रकरणी सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यूज १८च्या वृत्तानुसार, माझ्याकडे अनेकजण शिफारसपत्रे घेण्यासाठी येतात असं सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे.
माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास - सुनील टिंगरे
“माझ्या शिफारशीच्या पत्राबाबतच्या बातम्या या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्रे घेण्यासाठी येतात. जसे की शाळेसाठी प्रवेश, वैद्यकीय उपचार आणि बदलीच्या विनंत्या यासाठी शिफारस पत्रे मागितली जातात. तसेच मी प्रत्येक शिफारस पत्राखाली कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यानंतर योग्य ती कारवाई करावी, असे नमूद केले आहे. त्यामुळे या विषयाला वेगळे वळण देणे योग्य होणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल," असे आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे.