पुणे : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ( वय 53) यांचे गुरूवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चार दिवसापूर्वीच त्यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली होती.परंतु राज्य शासनाने पुन्हा त्याच्या बदलीला स्थगिती दिली होती. गायकवाड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.गायकवाड बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होते. परंतु गुरूवारी (दि.7) रोजी सकाळी घरी असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला.त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे स्टेशन येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. गायकवाड यांची सहा महिन्यापूर्वीच सातारा येथून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयत अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली होती. शासनाने मागील आठवड्यात महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये साहेबराव गायकवाड यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. परंतु येथे कामगार संघटनांनी राज्य शासन नियुक्त अधिकारी म्हणून गायकवाड यांना अतिरिक्त आयुक्त पदावर हजर करून घेण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान शासनाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. यामुळे बुधवारी ते नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदावर रात्री उशिरापर्यंत काम करत होते. गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 5:14 PM