पुणे - पुण्यातील हडपसर परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात मंत्रालयातील अप्पर सचिव सुहास रामराव चव्हाण (वय ४९, रा़ टिळकनगर, चेंबूर) यांचा मृत्यू झाला आहे.
दुचाकीवरुन जात असताना एका वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या बसने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लाेस्कर कंपनीजवळ रविवारी (3 मार्च) रात्री पावणे नऊ वाजता घडला.
सुहास चव्हाण हे मंत्रालयात अप्पर सचिव म्हणून काम करत होते. त्यांचे भाऊ हडपसर येथे राहतात. चव्हाण हे कात्रजवरुन भावाकडे जात होते. मंतरवाडी येथे एका वाहनाला चुकवून पुढे जात असताना अचानक समोरुन आलेल्या बसने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच टी कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक खोपडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून हडपसर पोलिसांनी आशयर बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सुहास चव्हाण हे मंत्रालयात लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांना दोन वर्षांपूर्वीच बढती मिळाली होती.