पुणे : शहराला वर्तुळाकार आकाराने कवेत घेणा-या मेट्रो मार्गाची प्राथमिक तयारी प्रशासनाने महामेट्रो कंपनीच्या साह्याने सुरू केली आहे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी लागणारा खर्च करण्याची तयारीही महापालिकेने दाखवली आहे. सध्याच्या मेट्रो मार्गाला हा मार्ग जोडून घेण्यात येईल.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर पत्रकारांबरोबर केलेल्या अनौपचारिक चर्चेत ही माहिती दिली. अंदाजपत्रकात कोणत्याही नव्या योजना नाहीत याकडे आयुक्तांचे लक्ष वेधल्यानंतर ते म्हणाले, उत्पन्नाच्या मर्यादा आहेत, मात्र त्यासाठी थांबून चालणार नाही. मेट्रोचा वर्तुळाकार मार्ग तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याची कितपत शक्यता आहे हे पाहिल्यानंतरच त्यावर सध्या काम सुरू आहे.याविषयी विस्ताराने सांगताना आयुक्त म्हणाले, ही उद्याच्या पुण्याची गरज असणार आहे, त्यासाठी आज काम करणे आवश्यक आहे. सध्या मेट्रोचे दोन मार्ग आहेत, ते शहराच्या मध्यभागातून जात आहे. कात्रज किंवा दुसरीकडे निगडीपर्यंत मेट्रो गेल्यावर तिथून ती वर्तुळाकार मार्गाने शहराच्या भोवतालच्या भागांशी जोडणे शक्य आहे. तसे केले तर शहरातंर्गत वाहतुकीवरील बराच मोठा ताण कमी होईल. हा पर्याय खर्चिक असला तरी करणे आवश्यक आहे.महामेट्रोच्या अधिकाºयांबरोबर याची प्राथमिक चर्चा केली आहे. आता तांत्रिक गोष्टी काय काय लागतील याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करायचा आहे. त्याच्या खर्चाची तयारीही महापालिकेने दाखवली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.महापालिकेचे आर्थिक नामांकन डबल प्लस ए असे आहे. उत्पन्न घटले म्हणून ते कमी होईल असे होत नाही. खर्च किती झाला त्यावर ते अवलंबून असते. जगातील सर्व देशांमधल्या मोठ्या महापालिकांनी त्यांचे उत्पन्न बाजारपेठेत दाखवले, ते दाखवून कर्ज उचलले व त्यातून मोठ्या खर्चाची विकासकामे गतीने केली. पुण्यानेही त्यात मागे राहू नये. येत्या काळात अनेक मोठी कामे करण्याची गरज निर्माण होणार आहे. केवळ महापालिकेच्या उत्पन्नावर ती होणार नाहीत. त्यासाठी कर्ज काढावेच लागेल, असे आयुक्त म्हणाले.
पुणे : वर्तुळाकार मेट्रोसाठी प्रशासनाचे प्रयत्न, प्राथमिक कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:42 AM