डिंभे - भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या सर्वत्र काढणीच्या कामांची लगबग सुरू असल्याचे पाहावयास मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती केवळ पळंज आणि पेंढाच लागत आहे. मागील वर्षी भातशेतीतून बऱ्यापैकी उत्पादन शेतक-यांच्या हाती लागले होते. मात्र, यंदा वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतल्याने जिल्ह्यातील हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली आहे. यामुळे भातउत्पादक हवालदिल झाले असून, यंदाचे वर्षे कसे जाणार याची चिंता लागली आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगात राहणा-या विशेष करून आदिवासी जनतेच्या जीवनाचा भातशेती ही मुख्य आधार मानली जाते. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर हे तालुके प्रामुख्याने भातशेतीचे आगार म्हणून ओळखले जातात. या तालुक्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. मिळणाºया एकूण उत्पादनापैकी आवश्यक तेवढे उत्पादन पदरी ठेवून तांदळाच्या विक्रीतून शेतकरी आपल्या इतर गरजा भागवीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष करून आदिवासी शेतक-याच्या जीवनाचा भातशेती मुख्य आधार मानला जातो.इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे भातउत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान व पाऊस राहिल्याने भातशेतीला यंदा तोड नव्हती. भात पेरण्यांसाठी काही ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली हे जरी खरे असले तरी काही शेतक-यांनी धूळवाफेवर पेरण्या उरकल्या होत्या.मात्र, यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने झालेल्या सर्व पेरण्या कारणी लागल्या होत्या. लागवडीसाठी यंदा कोठेही पावसाची वाट पाहावी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नव्हते. उलटपक्षी भातलागवडी वेळेत उरकल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदी वातावरण असल्याचे पाहावयास मिळत होते.मात्र, ऐन भातशेती जोम धरण्याच्या काळाच पुणे जिल्ह्यातून पावसाने काढता पाय घेतला. एकदा गेलेल्या पावसाने पुन्हा तोंड दाखविलेच नाही. आज पडेल उद्या पडेल या आशेवर शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागेल होते.मात्र, महिना दीड महिना उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसेनात. अखेर नवरात्रीत तरी पाऊस हजेरी लावीन नाहीतर दसºयाला तरी हमखास पडेन, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांची बाकी निराशा झाली. सध्या सर्वत्र भातकाढणीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी खाचरात असेल ते भात कापून झोडणी करतआहेत. मात्र, भात भाजलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ पळंज आणि पेंढाच लागत आहे.‘‘सध्या भातकाढणी सुरू आहे. पण भात भाजलेच नाही. खाचरात केवळ गवत (पेंढा) कापण्याची वेळ आली आहे. गवत झोडून हाती पळंज पडत आहे. पेंढा जनावरांसाठी साठवतोय; पण वर्षे कसे काठावर काढायचे याची चिंता आतापासूनच लागली आहे. हातावर पोट असणाºया आम्हा शेतकºयांनी यंदा काय खायचे?- रामा आंबेकर,आदिवासी शेतकरी,पोखरी (ता. आंबेगाव)‘‘जुन ते सप्टेंबरअखेर तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुका दुष्काळसदृश तालुका यादीमध्ये घेण्यासाठी सध्या महसूल व कृषी विभागामार्फत सत्यमापन परिस्थितीचा सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले आहे. हा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. पावसाअभावी भातपीक धोक्यात येत असले तरी परतीच्या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पादन शेतकºयांच्या हाती पडण्याची अपेक्षा आहे. मात्र सरासरी उत्पादनात घट होणार आहे.- संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव तालुकायंदाचा भात हंगाम वाया गेलेल्या शेतकºयांना आता उदरनिर्वाहाची चिंता लागली आहे. यंदाचे वर्षे कसे जाणार अशी हळहळ शेतकरीवर्ग करत आहे. काही शेतकºयांनी भातकापणीच्या कामांना अजून सुरुवात केली नाही. खाचरात भात वाळून गेल्याने त्याला दाणेच आले नाहीत. केवळ मात्र केवळ खाचराच्या बांधावर बसून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे शेतकºयांच्या हातात आता काहीच राहिले नाही.तर केवळ हातावर पोट असणाºया शेतकºयांना भातशेतीचा आधार असायचा. मात्र तेच उत्पादन यंदा हातचे गेल्याने हळहळ व्यक्त करण्यापलीकडे शेतकºयांच्या हातात यंदा काहीच राहिले नाही. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणाºया भातशेतीलाच यंदा निसर्गचक्राच्या लहरीपणाचा फटका बसला असून, यंदाचा भातहंगाम हातचा गेल्याने शेतकरीवर्ग पुरता उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहावयासमिळत आहे.
भातशेतीला हवामानबदलाचा फटका, यंदाचे वर्ष निघणार कसे? शेतकऱ्यांना पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:25 AM