पुणे : देशातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक असलेल्या पुणेविमानतळाचा प्रवासी संख्येचे वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील प्रवाशांची वाढ मागील वर्षीच्या तुलनेत १४.६ टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे पुणे विमानतळाने प्रवासी वाढीत प्रमुख विमानतळांमध्ये पाचवे स्थान मिळविले आहे.
एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडिया (एएआय)ने एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ चा प्रवासी संख्येची माहिती प्रसिध्द केली आहे. पुणे विमानतळावरून नोव्हेंबर महिन्यात दररोज जवळपास २०० विमानांची ये-जा होते. २०१७ मध्ये ही संख्या १९८ एवढी होती. तर प्रवासी संख्याही जवळपास ८२ लाखांच्या घरात गेली होती. मागील चार-पाच वर्षांत ही वाढ वेगाने झाली आहे. प्रवाशांकडून विमानसेवेला प्राधान्य मिळत आहे. तसेच पुण्याला शिक्षणासह उद्योग-व्यवसाय इतर कारणांसाठी पसंती वाढत चालली आहे. त्यामुळे विमानांच्या संख्या व प्रवाशांच्या वाढीचा वेग पाहता चालु आर्थिक वर्षात प्रवाशांची वार्षिक संख्या एक कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
‘एएआय’च्या माहितीनुसार, देशातील दहा विमानतळांमध्ये बेंगलुरू विमानतळाचा प्रवासी वाढीचा दर २८.७ टक्के असून हे विमानतळ पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल अहमदाबाद (२२.८ टक्के), हैद्राबाद (२१.९ टक्के) आणि चेन्नई (१४.७ टक्के) ही विमानतळे आहेत. पुणे विमानतळ पाचव्या स्थानी असून एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ६० लाख ६७ हजार ४७८ प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये १ लाख ५२ हजार ८२७ आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. तर देशांतर्गत प्रवाशांची संख्या ५९ लाख १४ हजार ६५१ नोंदविली गेली. २०१७ मध्येही ही संख्या ५१ लाख ६ हजार ३५२ एवढी होती. या प्रवाशांच्या संख्या तुलनेने १५.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात ४ हजार ७०४ देशांतर्गत विमानांचे उड्डाण झाले. २०१७ मध्ये ही संख्या ४ हजार ४३३ एवढी होती. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पुणे विमानतळावरून देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.