पुणे : नुकतेच नव्या विमानतळाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. परंतु, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षाविषयक मंजुरी मिळाल्याने नवीन विमानळावरून विमान उड्डाणासाठी प्रतीक्षा होती. ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने (बिकास) चार वेळा तपासणी केल्यानंतर सुरक्षाविषयी समाधान व्यक्त केली आहे. दिल्ली कार्यालयातून अंतिम मंजुरी मिळाल्यावर नव्या टर्मिलनवरून लवकरच विमान टेक ऑफ होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जुन्या टर्मिनलची क्षमता कमी असल्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन नवीन अद्ययावत टर्मिनल उभारण्यात आले. परंतु, प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू न झाल्यामुळे अजूनही जुन्या विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ होत आहे. सध्या सुरक्षाविषयक मुंबई विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात नवीन विमानतळ सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असून, हवाई प्रवास सुकर होणार आहे. आता दिल्ली कार्यालयातून अंतिम मंजुरी मिळाली की, विमान उड्डाणाचे मार्ग सुकर होणार आहे. सध्या जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या गर्दीमुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
असे आहे नवीन टर्मिनल...
एकूण क्षेत्रफळ - ५२ हजार चौरस मीटर
वार्षिक प्रवासी क्षमता - ९० लाख
वाहनतळ चारचाकी क्षमता - १ हजार
प्रवासी लिफ्ट - १५
सरकते जिने - ८
एकूण खर्च – ४७५ कोटी रुपये
नव्या टर्मिनलच्या सुरक्षाविषयक मंजुरी मुंबई विभागाकडून मिळाली आहे. अंतिम मंजुरीसाठी दिल्ली कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तिकडून मंजुरी मिळताच टर्मिनल सुरू लवकरच सुरू केले जाईल.
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ