पुणे : लोहगाव विमानतळ अशीच आजपर्यंत ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आता ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशी होणार आहे. असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली. केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेला हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात दिले होते.
मोहोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव देण्याचे भाग्य मिळाले ही फार मोठी आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. लोहगाव हे संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते. त्यांच्या प्रत्येक कीर्तनात लोहगावमधील चार टाळकरी असायचे. त्यामुळे या विमानतळाचे असे नामकरण करण्यामागे औचित्यही आहे. या विमानतळाला यातून एक वेगळी ओळख मिळणार आहे.
हा प्रस्ताव मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन दिला. त्यांनी याला लगेचच संमती दिली. त्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे जाईल. तिथेही मंजुरी मिळून लगेचच या विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रचलित होईल, असे मोहोळ म्हणाले.