पुणे : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उन्हाळी हंगामाची स्लाॅट उपलब्ध झाल्याने उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. मात्र, उन्हाळी हंगामामध्ये नवीन ठिकाणी विमान सेवा सुरू झाली नाही. गेल्या वेळेच्या उपलब्ध असलेल्या १०९ स्लाॅटपैकी दिवसाला १०४ विमानांची उड्डाणे होते आहेत. सोयी-सुविधा वाढल्याने नव्या टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी हंगामात १०९ स्लाॅट देण्यात आले आहेत. त्यापैकी १०४ स्लाॅटचा सध्या वापर होत आहे. पुणे विमानतळावरून सर्वाधिक विमाने दिल्ली शहरांसाठी उड्डाण करतात. पुण्यातून दिवसाला साधारण २० पेक्षा जास्त उड्डाणे दिल्लीला होतात. तर, तेवढीच विमाने पुण्याला येतात. पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुण्यातून सर्वाधिक उड्डाणे दिल्लीला होत आहेत. त्यानंतर बंगळुरूला दिवसाला १५ उड्डाणे होतात. तर, तेवढीच उड्डाणे बंगळुरू येथून पुण्याला होत आहेत. पुणे व बंगळुरू आयटी सिटी असल्यामुळे कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे विमानतळाला उपलब्ध असलेल्या स्लाॅटचा विमान कंपन्यांना जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सूचित केले असून, त्यामुळे प्रवाशांना त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यातून ३६ शहरांसाठी सेवा
पुण्यातून सध्या साधारण ३६ शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे. त्यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय विमान सेवा असून, सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या देशांचा समावेश आहे. दुबईसाठी दोन विमान सेवा सुरू आहेत. उन्हाळी हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेसह देशांतर्गत विमानांची संख्या वाढतील अशी अपेक्षा होती. परंतु, यामध्ये कोणतेही वाढ झालेली नाही.
दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्या ११ टक्क्यांनी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्या विमानतळावरून दिवसाला जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत.
उन्हाळी हंगामासाठी पुण्याला १०९ स्लाॅट मिळाले आहेत. यामुळे प्रवाशांना साेयीचे होणार आहे. शिवाय पुण्यातून देशांतर्गत ३६ आणि आंतरराष्ट्रीय तीन ठिकाणी प्रवाशांची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. - संतोष डोके, पुणे विमानतळ