पुणे : पुणे (लोहगाव) विमानतळावरील उड्डाणाची संख्या वाढणार आहे. १ डिसेंबरपासून विंटर शेड्युल सुरू होत असल्याने आताच्या तुलनेत ३० विमानांची संख्या वाढणार आहे. यात पुणे विमानतळांवरून नव्या शहरासाठीदेखील विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे विमानतळ १ डिसेंबरपासून २४ तास कार्यरत राहणार आहे, तसेच विंटर शेड्युल सुरू होत असल्याने जवळपास ३० विमानांची उड्डाणे वाढणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांत या बाबत चित्र अधिक स्पष्ट होईल. सध्या पुणे विमानतळावरून ६० विमाने येतात आणि जातात. दर एका तासाला १५०० प्रवाशांची वाहतूक होते. काही दिवसांपूर्वी ही संख्या ७०० ते ८०० इतकी होती. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
तर प्रवाशांची सुटका
पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवरील कोविडच्या टेस्टिंगच्या लाइनमधून सुटका होणार आहे. पुणे विमानतळावर दुसऱ्या शहरातून आलेला प्रवासी हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले लसीकरण प्रमाणपत्र, आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट आदी सर्व दाखवूनच त्याला प्रवासास परवानगी दिलेली असती. त्यामुळे त्याला पुन्हा तीच कागदपत्रे पुणे विमानतळावर दाखविणे गरजेचे नसताना केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी ती दाखवावी लागत आहेत; मात्र यासाठी प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. तसेच मनस्ताप ही सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच स्थानिक प्रशासनाला बोलून ही पद्धत तत्काळ बंद करावे, अशी मागणी करणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. तसेच मेट्रोची विमानतळाशी कनेक्टिव्हिटी निर्माण व्हावी म्हणून मेट्रोने डीपीआर तयार केले जाणार आहे. तीन महिन्यांत हा डीपीआर तयार केला जाईल.
सीआयएसएफची संख्या वाढणार
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची संख्या वाढत असल्याने त्याचा ताण प्रवाशांची तपासणी करताना पडत आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासन आता सीआयएसएफची संख्या वाढविणार आहे. सध्या ३५८ असलेली संख्या ५२६ केली जाणार असल्याचे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.