पुणे : राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेच्या सर्व शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. सर्व शाळांमधील अत्यावश्यक कामांसह साफसफाईची पूर्ण करण्यात आली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक सूचना पाळणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर, मास्कचा बंधकारक वापर आदी नियमांचे पालन सर्वांना करावे लागणार आहे. सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.
ज्या व्यक्तींना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक शाळा व्यवस्थापनाला शाळेच्या दर्शनी भागात कोरोनाविषयी माहिती लावण्याचीही सूचना करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या २५५ शाळा सर्व नियम व अटी पाळून सुरू करण्यात येतील, असे मोळक म्हणाले.