Nitin Raut : "आंबील ओढा कारवाईवेळी महापौर काय झोपा काढत होते का? डॉ.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 03:05 PM2021-06-29T15:05:35+5:302021-06-29T18:22:21+5:30
माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो.
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो.आंबील ओढा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकाच जबाबदार आहे. अशी कारवाई करताना महापालिकेला लाज वाटली पाहिजे. माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढंच आडवा पडलो असतो. मात्र. आंबील ओढा कारवाई सुरु असताना यावेळी महापौर काय झोपा काढत होते का? ते का पुढे आले नाही. त्यांनी बुलडोझर का थांबवला नाही. आता या कारवाईची राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
पुण्यातील आंबील ओढा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी डॉ. नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसभवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही.पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो. कोरोना महामारी सुरू असताना आणि ऐन पावसाळ्यात अशा प्रकारच्या कारवाईमुळे येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवनच उध्वस्त करण्यात आले. ही सर्व गरीब लोकं आहेत. फुले आणून हार, गजरे तयार करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.गेले कित्येक दिवस मंदिरे बंद असल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या या लोकांच्या घरावर बुलडोझर चालविला गेला. या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. पण याठिकाणी बिल्डरची माणसे हातात हातोडे आणि इतर साहित्य घेऊन हजर होते. तसेच या कारवाईच्या वेळी जबरदस्तीने येथील महिलांचे केस, हातपाय ओढले. त्यांना मारहाण करण्यात आली. या सगळ्या निंदनीय कृत्याची राज्य सरकारमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करत आहे.
पुणे महापालिकेच्या प्रशासनाचीच ही कारवाई असून त्याला महापालिकाच जबाबदार आहे. तिथे भाजपची सत्ता आहे.मात्र, या कारवाई दरम्यान भाजपचा कोणीही प्रतिनिधी तिथे गेला नव्हता.प्रशासनाला कायदेशीर अधिकार प्राप्त असले, तरी पावसाळी कालावधीत तुम्हाला कुणाच्या घराला हात लावता येत नाही, घरं तोडता येत नाही. आणि याठिकाणी वीज आधी तोडलेली नाही. बुलडोझरने तुटली असे स्पष्ट करतानाच या सर्व कारवाईची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांवरील आरोपाबाबत राऊतांनी भाष्य टाळलं
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या बिल्डरकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहे. यावर राऊत यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले आहे. त्यांनी यावेळी या संपूर्ण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका स्पष्ट केली.
चौकशीतून सत्य बाहेर येईल...
आंबील ओढा कारवाईवेळी दलित महिलांशी करण्यात आलेलं गैरवर्तन ऐकून तीव्र दु:ख झालं आहे. दलित समाजावर अन्याय झाला आहे.त्याचमुळे या कारवाईची राज्य सरकारमार्फत चौकशी कऱण्यात यावी अशी मागणी मी करणार आहे. चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल आणि मी कोणालाही वाचवू इच्छित नाही.तसेच या कारवाई दरम्यान महिलांना ज्यांनी हात लावला अशा दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.