आंबिल ओढ्यातील कारवाई होत असलेल्या प्रकल्पातील सर्व नागरिकांचे पुनर्वसन होणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. कारवाई महापालिकेतर्फे होत असली तरी त्यांचा पुनर्वसनाचे सर्व नियोजन एसआरएने करून मगच या कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुण्यातील आंबील ओढा परिसरात ओढ्याची खोली आणि रुंदी वाढवून त्याचा कडेला भिंत बांधण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. पूर येऊ नये म्हणून या ओढ्याचा प्रवाह देखील पुर्ववत करण्याचे काम केले जात आहे. याच्या मध्ये येणाऱ्या दांडेकर पुलालगतच्या वस्तीमधील घरे हटवण्यासाठी आज पालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. आज सकाळ पासूनच या कारवाईला सुरुवात झाली आहे. पण या कारवाई विरोधात नागरिक प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
या लोकांचा पुनर्वसनाची कोणतीही सोय केली नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे.या संपूर्ण प्रकरणाबाबत लोकमतशी बोलताना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर म्हणाले ," महापालिकेकडून ही कारवाई केली जात आहे. ओढ्याचा इथे तिरपा होणारा प्रवाह नीट करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कारवाई केली जात आहे. आम्ही त्यांचा पुनर्वसनाचे नियोजन करत आहोत. या ठिकाणी 134 घरे आहेत. या सर्व लोकांचे पुनर्वसन ट्रान्झिट कॅम्प मध्ये करण्याची तयारी झालेली आहे. जवळपास ३-४ महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून १३४ पैकी ४०-५० जण यापूर्वीच शिफ्ट झाले आहेत. विशेष बाब म्हणून इथे पात्रता निकष गृहीत न धरता सर्वांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये नेले जाणार आहे. तसेच नंतर इथे ७०० घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी देखील या वस्तीतील 90% लोक पात्र आहेत. त्यांना इथे पुन्हा घरे मिळतीलच".