पुणे अन् पिंपरी चिंचवड झोपडपट्टीमुक्त करणार, अजित पवारांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 08:43 PM2021-08-29T20:43:11+5:302021-08-29T20:43:31+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नियमावलीमध्ये बदल करुन झोपडपट्टीधारकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यात येतील. झोपडपट्टीधारकांना स्वत:ची हक्काची व मालकीची घरे मिळण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

Pune and Pimpri Chinchwad will be slum free, believes Ajit Pawar | पुणे अन् पिंपरी चिंचवड झोपडपट्टीमुक्त करणार, अजित पवारांचं आश्वासन

पुणे अन् पिंपरी चिंचवड झोपडपट्टीमुक्त करणार, अजित पवारांचं आश्वासन

Next
ठळक मुद्देशहराचा विकास करताना कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या सारख्या पायाभूत सुविधांचा विचार केला पाहिजे. शहरातील नागरिकांनी आपल्या शहराच्या नावाला धक्का पोहचेल अशा प्रकारचे काम करु नये.

पुणे - झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार पेठ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत “सदा आनंदनगर” 130 घरांचे चावी वाटप व करारनामा लोकार्पण सोहळा पार पडला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नियमावलीमध्ये बदल करुन झोपडपट्टीधारकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यात येतील. झोपडपट्टीधारकांना स्वत:ची हक्काची व मालकीची घरे मिळण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. पुणे शहरातील झोपडपट्ट्या काही सरकारी जागेत तर खासगी जागेत आहेत. या झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करताना उत्तम प्रकारचे प्रकल्प उभारुन नागरिकांना हक्काचे व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यासह पुणे व पिंपरी चिंचवड परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असल्याचे सांगत झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या कामी पुढे येणाऱ्याला शासनाच्यावतीने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

शहराचा विकास करताना कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या सारख्या पायाभूत सुविधांचा विचार केला पाहिजे. शहरातील नागरिकांनी आपल्या शहराच्या नावाला धक्का पोहचेल अशा प्रकारचे काम करु नये. शहरातील मेट्रो प्रकल्प, रिंग रोड प्रकल्प, विमानतळ या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सारखे सण येत आहेत. नागरिकांनी उत्साहांच्या भरात नियमांचे पालन न केल्यास कोराना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरुन राज्य शासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निबांळकर म्हणाले, झोपडपट्टीधारकांचे स्थालांतर करताना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने नागरिकांना पक्के व मोफत घरे उपलब्ध करुन देताना प्राधिकरणाची प्रतिमा उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाईल. याकरिता गरज पडल्यास सर्वांना विश्वासात घेवून नियमात बदल केले जाईल, अशा विश्वास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निबांळकर यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नामदेव खराडे, रहमान शेख, बशीरअली शेख, सुमन दिघे व सुभाष कदम यांना घराच्या चावी व नस्ती प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर प्रास्ताविक माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केले.
 

Web Title: Pune and Pimpri Chinchwad will be slum free, believes Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.