Pune Assembly Election Result 2024 : कुजबुज संपून काम केले जाईल का? काँग्रेस कार्यकर्ते उद्विग्न : नव्यांना संधी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 02:54 PM2024-11-26T14:54:54+5:302024-11-26T14:56:51+5:30
सलग तिसऱ्यांदा शहरातून काँग्रेस पक्षाचे उच्चाटन झाले. आठ जागांपैकी एकही जागा या पक्षाच्या हाती लागलेली नाही.
पुणे : काँग्रेस भवनमध्ये हलकेच पत्रकारांच्या कानाला लागत असे म्हणत होता. निमित्त होते नेत्यांमध्ये समोर खुर्चीवर बसण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचे. त्या कार्यकर्त्याचे बोल खरे ठरले. सलग तिसऱ्यांदा शहरातून काँग्रेस पक्षाचे उच्चाटन झाले. आठ जागांपैकी एकही जागा या पक्षाच्या हाती लागलेली नाही. ‘निसटता पराभव झाला’ असे म्हणण्याचीही संधी मतदारांनी काँग्रेसला शहरात कुठेही दिलेली नाही.
तेचतेच चेहरे
या दारूण पराभवाने काँग्रेसचा सामान्य, तळातील कार्यकर्ता उद्विग्न झाला आहे. समोर अनेक संधी असतानाही कधी पक्ष बदलला नाही, पक्षाने काहीही दिले नाही त्याची कधी खंत बाळगली नाही, पण नेत्यांकडून कोणती अपेक्षाच पूर्ण व्हायला तयार नाही. सरंजामी वातावरणातून बाहेर यायलाच कोणी तयार नाही तर मग काम करायचे तरी कशाला? असा त्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर तेचतेच चेहरे किती वर्ष पहायचे? नव्या, ताज्या दमाच्या तरूण रक्ताला या पक्षात कधी वाव मिळणार आहे की नाही? प्रतिस्पर्धी पक्षाची दुसरी फळी तयार होऊन ती कार्यरत झाली, पदांपर्यंत पोहचली तरीही आमच्या पक्षातील नेहमीचे तेचतेच चेहरे मात्र हटायलाच तयार नाहीत, पद बदलून पुन्हा तीचतीच नावे येत राहतात असे त्यांचे म्हणणे आहे.
तळातील कार्यकर्त्याला ताकद नाही
काँग्रेसच्या या पराभवानंतर तळातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला असता अनेकांनी बरेच काही सांगितले. त्यातील अनेकांच्या तक्रारीत एक साम्य आहे, व ते म्हणजे पक्षाचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष होता जो तळातील अगदी साध्यातील साध्या कष्टकरी माणसांपर्यंत पोहाेचला होता. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीच्या काळात फार काही करायलाच लागत नव्हते. त्याच्यापर्यंत पोहचून उमेदवाराचे नाव वगैरे सांगितले तरी काम व्हायचे. त्याशिवाय नेते स्वत: वस्त्यांमध्ये येत. तिथे काम करणारी फळी तयार करत. त्यांना राजकीय बळ देत. निवडणूक नसली तरीही ही कामे सुरू राहायची. आता असे होते का? एका कार्यकर्त्यानेच प्रतिप्रश्न केला.
सर्वमान्य नेत्याचा अभाव
संपूर्ण शहराला राजकीय कवेत घेऊ शकेल, असा नेताच राहिला नसल्याची खंत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सुरेश कलमाडी, त्याआधी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, त्याही आधी जयंतराव टिळक असे सर्वमान्य नेते वरच्या फळीत काम करत. खाली स्थानिक स्तरावर भाऊसाहेब शिरोळे, बाबूराव सणस ही मंडळी होती. त्यांनी कधीही स्वत:पुरते पाहिले नाही. शहराच्या प्रत्येक भागात कार्यकर्ते तयार केले, नेते तयार केले. त्यांना वेळोवेळी पुढे यायची संधी दिली. महापालिकेत उमेदवारी दिली. निवडून येतील असे पाहिले. त्यामुळे पक्षात सतत राजकीय हालचाली होत राहतात. त्या होत असतानाही नागरिक हाच केंद्रबिंदू असे. ही प्रक्रिया बंद झाली व पक्षाला उतरती कळा लागली असे शहरातील बऱ्याच जुन्या काँग्रेस जणांचे निरीक्षण आहे.
पक्षाच्या शाखा शक्तीहीन
सन २००९ पासून लोकसभा ते महापालिका, काँग्रेसची पिछेहाटच होत आहे. त्याही आधीपासून पक्षात असलेले चेहरेच आजही आहेत. ज्यांच्या काळात पक्ष राजकीयदृष्ट्या पिछाडीला गेला, त्यांनाच वरच्या नेत्यांनी पुन्हापुन्हा नवनवीन पदे दिली. ती पदे मिळावी म्हणून धडपडणाऱ्या नव्या फळीला कधीही जवळ केले गेले नाही. पक्षातील कोणतेही पद हे त्याच त्याच चेहऱ्यांना मिळत गेले. यातून युवक शाखा सुकून गेली. विद्यार्थी संघटनेला ताकदच राहिली नाही. व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक असे वेगवेगळे सेल केवळ नावालाच राहिले. यांच्या ताकदीच्या बळावर काँग्रेसची मुख्य संघटना निवडणूक लढत असे व जिंकत असे. ही मुळेच नेत्यांनी कापून टाकली, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
लोकांबरोबर संपर्क तुटला
लोकांबरोबर असलेला पक्षाचा संपर्कच तुटला असेही काहीजणांचे म्हणणे आहे. ऐन निवडणुकीत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनचा उंबरासुद्धा ओलांडला नाही, अशी टीका त्यांनी केली. तिथले नियोजन महत्त्वाचे की लोकांमध्ये जाऊन केलेले काम महत्त्वाचे? असे प्रश्न त्यांनी केले. उमेदवार व त्यांची स्वतंत्र यंत्रणा निवडणुकीपुरते काम करते व नंतर गायब होते. पक्षाची वाढ, पक्षाचा पाया विस्तारणे, पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे दूरच, पण ‘आपला’ उमेदवार आहे तर तो निवडून यावा यासाठी अंग झटकून काम करण्याचेच नेते विसरून गेले आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या या पराभवाची जबाबदारी कोण स्वीकारते व राज्याकडून याचा ठपका कोणावर ठेवला जातो तेच आता आम्हाला पाहायचे आहे असे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राज्यातला व शहरातलाही हा निकालच आम्हाला मान्य नाही. आम्ही प्रचारात होतो, त्यावेळी लोकांच्या भावना स्पष्टपणे कळत होत्या. त्यामुळे व प्रतिस्पर्धी पक्षांच्या एकूण कार्यपद्धतीमुळे निकालाविषयीच शंका आहे, पण काँग्रेसला असे पराजय नवीन नाहीत. अशा पराजयानंतर काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊन काम करू - अरविंद शिंदे - शहराध्यक्ष, काँग्रेस
भाजपने केलेले धार्मिक ध्रुवीकरण यशस्वी होत गेले व त्याला होत असणारा काँग्रेसचा विरोध जेवढा तीव्र व्हायला हवा होता तेवढा झाला नाही, हे वास्तव आहे. राज्यातील निकाल धक्कादायक आहेतच, पण काँग्रेस त्यामुळे खचून जाणार नाही. शहरातील आम्ही नवी फळी तयार करू व काँग्रेसची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी विचारधारा आहे, त्यावरच काम करू. मोहन जोशी - प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस