पुणे : रांजणगाव येथील एका कंपनीकडे कराराप्रमाणे असलेली थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्यासाठी तक्रारदाराविरूद्ध कारवाई न करण्याकरिता 2 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेअटक केली. देवीदास हिरामण कारंडे असे अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार यांचे रांजणगाव येथील एका कंपनीकडे लेबर कॉंट्रँक्ट आहे. या कराराप्रमाणे कंपनीकडील थकीत रक्कम मिळवून देण्याबरोबरच कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाई न करण्यासाठी कारंडे यांनी 2 लाख रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करून कारंडे यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ माने करीत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.