पुणे : अॅमेझॉन कंपनीने डिलिव्हरीसाठी विमानाद्वारे मागविलेले वेगवेगळ्या कंपनीचे २३४ मोबाइल लोहगाव विमानतळावरून चोरून त्यांची विक्री करणा-या कर्मचा-यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ त्याच्याकडून चोरलेले १० लाख रुपये किमतीचे ४५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़सूरज सुरेश कदम (वय २५, रा़ भैरवनगर, धानोरी रोड) असे त्याचे नाव आहे़ याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले यांनी माहिती दिली़ अॅमेझॉन ट्रॉन्स्पोर्टेशन सर्व्हिसेस ही कंपनी पुण्यात डिलिव्हरी करण्यासाठी विमानाने मोबाइल मागवते़ या पार्सलमधून मागील एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ५१ लाख रुपयांचे २३४ मोबाइल लंपास करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे सिक्युरिटी अँड लॉस प्रिव्हेंशन मॅनेजर प्रणव गोपाळ बोरूळे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील यांना माहिती मिळाली, की एक जण येरवडा येथील टिंगरे वावर परिसरात हातात प्लॅस्टिकची पिशवी घेऊन संशयितरित्या उभा आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी तेथे सापळा लावून सूरज कदमला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे ४ मोबाइल हँडसेट पोलिसांना सापडले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने मित्र व नातेवाईक यांना विक्री केलेले ४१ मोबाईल असे १० लाख ९ हजार रुपये किमतीचे ४५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस नितीन भोसले पाटील, धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस हवालदार सचिन जाधव, तुषार खडके, सुधाकर माने, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, मोहन येलपले, गजानन सोनुने, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड, इम्रान शेख, उमेश काटे यांच्या पथकाने केली.‘ओएलएक्स’वरून केली विक्री-सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक्सवरूनही काही मोबाईल त्याने व्यापा-यांनाही विकले. हे मोबाईल फक्त अॅमेझॉनवरून आॅनलाईन विकले जातात़ त्यामुळे ते कमी किमतीत मिळत असल्याचे पाहून लोक घेत होते़ सोबत पावती असल्याने लोकांना शंका येत नसे़ हे सर्व मोबाईल त्याने पुणे व मुंबईतील लोकांना विकले असून, त्यांची माहिती घेऊन ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पुणे : विमानतळावरून मोबाइल लंपास करणारा अटकेत, ४५ मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 6:07 AM