पुणे : औरंगाबाद महामार्ग ‘ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे’ असा राष्ट्रीय महामार्ग होत असून, त्याला ५५३ (एफ) असा क्रमांकही देण्यात आला. साधारण २३५ किलोमीटर रस्ता हा आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाला तो जोडण्यात येणार आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२२ पर्यंत सादर करण्यात येणार आहे.
अहमदनगर येथे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यात पुढील कार्यवाही करण्यासाठी नियमित बैठकाच होत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हा रस्ता हस्तांतरण करण्यापूर्वी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खराडी (जकात नाका) ते शिक्रापूर असा २५ किलोमीटरवर रस्तारुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी ३ मे २०२० ला २१९ कोटी रुपये मंजूर करून काम सुरू होऊन ३० टक्के झाले आहे.